इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये लघुत्तम (मायक्रो) आणि लघु उद्योगांचे महत्वाचे स्थान आहे. असे सर्व उद्योजक यांच्याकडून मोठे खरेदीदार, कंपन्या, महामंडळे वरचेवर काही ना काही खरेदी करत असतात. परंतु त्यांच्याकडून खरेदी केलेल्या मालाचे, सेवेचे पैसे अनेक महिने दिले जात नाहीत व त्यामुळे या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आजारपण दिसते. यासाठी लघुत्तम व लघु उद्योगांकडून खरेदी करणाऱ्यांनी ४५ अथवा ६० दिवसात पैसे द्यावेत असा एमएसएमइडी कायदाही केला. त्यामुळे काहीसा दिलासाही मिळाला असला तरी हि समस्या पूर्ण अंशाने सुटली नव्हती. यावर सातत्याने महाराष्ट्र चेंबरसारख्या संस्थांनी भारत सरकारकडे लकडा लावला होता की, याला अनुषंगून करविषयक कायदाकडे बदल केला जावा. त्यानुसार गेल्यावर्षी आयकर कायद्यामध्ये आवश्यक तो बदल करण्यात आला होता. हा बदल आता लागू झाला असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
ते म्हणाले की, लघुत्तम व लघु उद्योजकांचे पेमेंट जर वेळेत केली गेली नाहीत तर संबंधित खरेदीदाराला आयकर कायद्याखाली अशी सर्व रक्कम धंद्याचा खर्च म्हणून वजावट मिळणार नाही. त्यामुळे सर्व खरेदीदारांचे उत्पन्न व नफा वाढला जाऊन त्यांना त्यावर मोठा आयकरही भरावा लागेल. साहजिकच अशी वेळ येऊ नये म्हणून खरेदीदारांनी वेळेवर लघुत्तम व लघु उद्योजकांचे पैसे व देणी पूर्ण करावीत अशी यामागील स्वच्छ भूमिका आहे. निश्चितच या बदलाचा लघुत्तम व लघु उद्योजकांना फायदा होईल असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
नोंदणी करून घ्या
आपण लघुत्तम आणि किंवा लघु उद्योजक आहोत हे सर्वाना समजण्यासाठी प्रत्येक छोट्या उद्योजकाने एमएसएमइडी कायद्यानुसार नोंदणी करून घ्यावी. हि नोंदणी अतिशय सुटसुटीत आणि ऑनलाईन पद्धतीने होणारी आहे. या नोंदणीचा जो क्रमांक मिळतो तो त्यांनी आपल्या बिलांवर जरूर छापावा. त्यामुळे ते सदरहू कायद्याखाली येत आहेत आणि त्यांचे पेमेंट वेळेत करायलाच पाहिजे असे सर्वांना लक्षात येईल. यासंदर्भात अधिक माहितीसाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँण्ड अग्रिकल्चरशी व्यापारी उद्योजकांनी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले आहे.