नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीककडे अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरु असतांना दुसरीकडे नाशिकला एका भिकारी महिलेकडून एक वर्षाच्या लहान बालकांची पोलिसांनी सुटका केली. पोलिस या सोहळ्यासाठी गस्त घालत असतांना त्यांना या महिलेकडे एक बालक दिसले. या महिलेकडे बघून ते तिचे नसल्याचा पोलिसांना संशय आला. त्यानंतर त्यांनी विचारपुस केल्यानंतर या महिलेने उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हे बालक पळवून आणल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याची सुटका करुन पोलिसांनी ते पालकांकडे सुपूर्द केले.
या घटनेबाबत पोलिसांनी सांगितलेली माहीती अशी की, भद्रकाली पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार व पथक हे पोलीस ठाणे हे हद्दीत गस्त घालत असतांना गुन्हे शोध पथकाचे नरेंद्र जाधव, संदीप शेळके, लक्ष्मण ठेपने, महेशकुमार बोरसे यांना पिंपळ चौकात एक भिकारी महिला एक वर्षाच्या लहान बाळाला घेऊन आडोशाला भीक मागत उभी होती. तिच्या वर्णनावरून व तिच्या जवळ असलेला लहान बाळ हे तिचे नसल्याचा संशय आल्याने सदर महिलेला गुन्हे शोध पथकाने चौकशी केली असता तीने उडवा उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर तीने तिच्या ताब्यातील असलेले बाळ हे मुलगा असल्याचे सांगितले. परंतु पथकाने पाहणी केली असता सदर बाळ हे मुलगा नसून मुलगी असल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेने बाळ कुठून तरी पळून आणल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर या भिकारी माहिलेने हे बाळ रामकुंड पंचवटी येथून सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पळविल्याचे समोर आले. पंचवटी पोलीस ठाणे येथे माहिती घेतली असता त्यांनीही सदर दुजोरा दिला. त्यानंतर हे बाळ पालकांना सुपूर्द करण्यात आले. या लहान बाळाचे नाव सोनू विकी कांबळे,रा. बळी मंदिर चक्रधर नगर, जत्रा हॉटेल आडगाव, नाशिक हे आहे. तर भिकारी माहिलेचे नाव सुनिता अशोक काळे (४५) असे आहे. या सर्व घटनेची माहिती भद्रकाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दिली.