इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वाशिम : एकीकडे अहमदनगर जिल्ह्यात ज्येष्ठ सामाजिक व मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांना दोन जणांनी रस्त्यात दुचाकी अडून डोक्यात आणि पाठीत रॉडले जबर मारहाण केली. यामध्ये कुलकर्णी हे गंभीर जखमी झाले असून या प्रकारामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यातच दुसरीकडे विदर्भातील वाशिम जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात एका शिक्षकाला रस्त्यात आढळून एका अज्ञात इसमाने त्यांच्यावर पेट्रोल टाकून भर रस्त्यात जिवंत जाळले. यामध्ये त्या शिक्षकाचा जागी मृत्यू झाला असून या प्रकरणामुळे संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून संबंधित आरोपीला तातडीने अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.
कोल्ही शिवारात हा भयानक प्रकार घडला
नाशिकमध्ये जसा मालेगाव तालुका आहे, त्याचप्रमाणे वाशिम जिल्ह्यात देखील एक मालेगाव तालुका आहे. हा तालुका तसा सर्वच दृष्टीने काहीसा मागासलेला समजला जातो. शैक्षणिक क्षेत्रातही फारशी प्रगती येथे नाही, तरीही शिक्षक मोठ्या निष्ठेने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शिकवत असतात, त्यातच एका शिक्षकांच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावर कोल्ही शिवारात हा भयानक प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या भागातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यानंतर शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. कोल्ही शिवारातून जात असताना अज्ञात व्यक्तींनी दिलीप सोनवणे यांचा रस्ता अडवून त्यांच्या डोक्यावर रॉडने मारहाण केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिले.
उपचारापूर्वीच मालवली प्राणज्योत
दिलीप धोंडोजी सोनवणे हे मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना अचानकपणे दिलीप सोनवणे यांचा अज्ञात व्यक्तींनी रस्ता अडवला. काही समजण्याच्या आतच त्या अज्ञात व्यक्तीने सोनवणे यांच्या डोक्यात रोडने जबर मारहाण केली. या घटनेत दिलीप सोनवणे गंभीररित्या जखमी झाले.
त्यानंतर त्या हल्लेखोर व्यक्तींनी रॉडने डोक्यावर मारहाण करून पेट्रोल ओतून पेटवले. या हल्ल्यात शिक्षक दिलीप सोनवणे हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिलीप सोनवणे यांना मृत घोषित केले.
फडणवीस यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही – खा. सुप्रिया सुळे
कोल्ही बोर्डी, जि. वाशिम येथे शाळेवर जात असताना एका शिक्षकाला अडवून त्याला मारहाण करून जीवंत जाळल्याची घटना घडली. हा प्रकार अतिशय दुःखद, दुर्दैवी आणि चीड आणणारा आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्याकडे लक्ष नाही. गुन्हेगार निर्ढावले असून दिवसाढवळ्या गुन्हे करत आहेत. वाशिम जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून गुन्हेगारांना गजाआड करावे असी प्रतिक्रिया खा. सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.