मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा लोकार्पणाच्या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी शेलमला मल्लिकार्जुन मंदिरात दर्शन घेतले. या वेळी त्यांनी संन्सास घेण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु त्यांच्या वरिष्ठ मंत्र्यांनी त्यांना परत स्वराज्यात नेले, असे त्यांनी केल्याने ही इतिहासाची मोडतोड आहे. गोविंदगिरी महाराज यांनी आपल्या भाषणात समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराज यांचे गुरु होते, असे सांगितल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यावर आक्षेप घेऊन हे वक्तव्य मागे घेण्याची विनंती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांशी अन्य कुणाशी केलेली तुलना महाराष्ट्रात कायमच वादाला निमंत्रण देत असते. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरू नव्हते, असे इतिहासकार सांगतात. त्यामुळे गोविंददेवगिरी उर्फ आचार्य किशोरजी व्यास यांचे विधान वादाला कारण ठरले आहे. आ. पवार यांनी जाहीररीत्या सर्वांत अगोदर वक्तव्य केले असले, तरी आता त्यावर आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
आ. पवार म्हणाले, की गोविंदगिरी महाराज इतिहासाचे दाखले देताना चुकत आहेत. प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान योग्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होते; परंतु त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही. त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापना आणि ते वाढवण्याला सर्वोच्च महत्त्व दिले.