नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी नाशिकमध्ये सोमवारी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महापूजा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबियासह गोदा घाटावर महाआरती केली. आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ठाकरे ते काय बोलतात. त्यांची तोफ कशी धडाडते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
अयोध्येत श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर देशभर काल उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर ठाकरे यांची ही पहिलीच सभा होणार असल्यामुळे त्यांच्या सभेकडे सत्ताधा-यांचे लक्ष असणार आहे. गेल्या काही दिवासांपासून ठाकरे गटाने नाशिकमध्ये दर्शन, आरती व राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी केली होती. त्यामुळे या सभेला चांगलीच गर्दी असणार आहे.
सोमवारी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये विमानाने दाखल झाले. त्यानंतर त्यांनी भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन केले. त्यानंतर सायंकाळी उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात महापूजा करुन गोदा घाटावर महाआरती केली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.