मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येणार म्हटल्यावर केवळ विरोधकांना नव्हे तर भाजपमधील नेत्यांनाही धडकी भरत असते. त्यातच लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अमित शहांनी लोकसभा निवडणुकीचा मास्टर प्लान राज्यातील भाजप नेत्यांना दिल्याची माहिती पुढे येत आहे.
लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अमित शहा यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांना राज्यातील वादग्रस्त जागांबाबतही सविस्तर चर्चा केली. या आढावा बैठकीत पुणे, जळगाव आणि दक्षिण मुंबई या तीन वादग्रस्त जागांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. पुणे लोकसभेची जागा ही भाजपकडे असून त्या ठिकाणचे खासदार गिरीश बापट यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार अशी चर्चा होती, पण ती झाली नाही. आता या ठिकाणची निवडणूक ही लोकसभेसोबतच होणार असल्याचे स्पष्ट आहे.
दुसरीकडे जळगावच्या जागेवरून काहीशी स्पष्टता नाही. या ठिकाणच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे या जागेवर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास गिरीश महाजन आणि इतर नेत्यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खेडसे स्वतः निवडणूक लढू शकतात, तसे संकेतही त्यांनी दिले आहेत. मग त्या ठिकाणी कुणाल उमेदवारी द्यायची हा प्रश्न सध्या भाजपसमोर आहे.
दक्षिण मुंबई ही मुंबईतील सर्वात प्रतिष्ठेची जागा असल्याचं सांगितलं जातंय. सध्या या ठिकाणी ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. गेल्या निवडणुकीवेळी ही जागा भाजपने मागितली होती. या मतदारसंघात उद्योजक आणि इतर महत्त्वाच्या व्यक्ती राहायला आहेत. त्यामुळे या जागेवर भाजपचा दावा सांगितला जातोय. गेल्या निवडणुकीत भाजपच्या काही नेत्यांनी अरविंद सावंत यांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा होती. अरविंद सावंत हे कमी मतांच्या फरकाने विजयी झाले.
कौल जाणून घेतला
गेल्या चार वर्षांत राज्यात दोनवेळा सत्ता परिवर्तन झाले. अशात विरोधकांची काय स्थिती आहे आणि लोकांच्या मनात काय आहे, याचीही माहिती अमित शहांनी घेतली. राज्यातील राजकीय स्थितीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी चर्चा केली.