इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वडोदराः सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींनी रविवारी रात्री उशिरा गोध्रा तुरुंग अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले. बिल्किस सामूहिक बलात्कारातील आरोपींना शिक्षेत सूट देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना २१ जानेवारीपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. शिवाय सर्वोच्च न्यायालयात आरोपींनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळण्यात आली होती. त्यातील काही आरोपी काही दिवस गायब होते. ते हजर झाले नसते, तर पोलिसांना त्यांना अटक करावी लागली असती. त्यामुळे त्यांना आत्मसमर्पण केल्याशिवाय पर्याय नव्हता. सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील ११ आरोपी दोन वाहनांतून दाहोद जिल्ह्यातील सिंगवाड येथून गोध्रा उप कारागृहात पोहोचले.
या आरोपीत राधेश्याम शाह, जसवंत नई, गोविंद नई, केसर वोहनिया, बाका वोहनिया, राजू सोनी, रमेश चंदना, शैलेश भट्ट, बिपिनचंद्र जोशी, प्रदीप मोढिया आणि मितेश भट्ट यांचा समावेश आहे.