नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. यापकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिला अपघात नाशिक- पुणे मार्गावरील चिंचोली नाका भागात झाला. सुरज शिवराम विश्वकर्मा (२८ रा.खाटे गल्ली सिन्नर) या युवकाचा यात अपघात झाला. विश्वकर्मा शुक्रवारी (दि.१९) नाशिक पुणा मार्गाने सिन्नरच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना ही घटना घडली. चिंचोली नाका येथील उड्डाणपूलावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली. या अपघातात सुरजचा मृत्यू झाला. याबाबत विजय विश्वकर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.
दुस-या अपघात औरंगाबादरोडवर झाला. आडगाव नाका भागातील गुरूजीतसिंग जितेंद्रसिंग सैनी (२२ रा.स्वामी समर्थ केंद्राजवळ,संत जनार्दन स्वामीनगर) हा युवक गेल्या गुरूवारी रात्रीच्या सुमारास औरंगाबादरोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. इस्सार पेट्रोल पंपासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गुरूजीतसिंग सैनी या युवकाचा मृत्यू झाला. याबाबत जितेंद्रसिंग सैनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात सुनिता आंधळे नामक महिलेविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार राजुळे करीत आहेत.
तिसरा अपघात जेलरोड भागात झाला. रावण रोबर्ट स्वामी (२३ रा.जेलरोड) हा युवक रविवारी (दि.२१) जेलरोड भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होता. महाजन हॉस्पिटल समोरून जात असतांना भरधाव दुचाकी पुढे जाणाºया कारवर जाऊन आदळली या अपघातात स्वामी गंभीर जखमी झाला होता. त्यास रूग्णालयात दाखल केले असता डॉ. हेमंत काळे यांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. याबाबत कारचालक मुकेश पाटील (रा.गोसावीवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अदिक तपास उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.