जगदीश देवरे
‘शुन्यातून विश्व निर्माण करणे म्हणजे नक्की काय करणे?’ याचे शब्दशः प्रात्यक्षिक ऑस्ट्रेलियाविरूध्द विश्वचषक २०२३ च्या सलामीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने अनुभवले. विराट कोहली आणि कन्नूर लोकेश राहूल अर्थात के.एल.राहूल या जोडीने या वाक्यातील शुन्याला धोबीपछाड दिली आणि विजयाचे ‘विश्व’ साकारून विश्वविजयाच्या मोहीमेची दमदार सुरूवात केली आहे. विराट आणि राहूल, एकामागून एक असे दोघेही मैदानावर उभे राहीले त्यावेळेला भारताची धावसंख्या ‘शुन्य’ अशीच होती.
‘शुन्य’ यासाठी की धावफलकावर जरी त्यावेळी ३ बाद २ असे दिसत असले तरी त्या दोन्ही धावा अवांतर धावा होत्या. रोहीत, ईशान आणि श्रेयस यांच्या बॅटला लागून त्या धावा निघालेल्याच नव्हत्या. जिंकायला फार नाही तर अवघ्या २०० धावांची गरज असतांना दुसरीकडे मिशेल स्टार्क आणि जोश हेझलवूड हे दोन्ही ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेंडूला झणझणीत फोडणी घालून गोलंदाजी करीत होते. विराट आणि राहूल या दोघांनी या झणझणीत फोडणीमुळे खेळपट्टीवर तयार झालेला धुराळा थोडा थंड होवू दिला आणि मग अनुभव पणाला लावून टारगेटच्या दिशेने प्रवास सुरू केला. या वेळी तिखट फोडणीचा ठसका लागावा तसा विराटचा एक कॅच सुटला खरा, परंतु क्रिकेटमध्ये याला ‘जीवदान’ म्हणतात आणि असली पुण्यकर्म केल्यानंतर बॅटसमनने थांबायचं नसतं, त्या जीवदानाचा फायदा उचलायचा असतो. विराटने तेच केलं.
भारतीय संघासाठी विश्वचषकाची मोहीम आत्ता कुठे सुरू झाली होती आणि या शुभारंभालाच ऑस्ट्रेलियाने सपासप वार केल्यानंतर संपूर्ण मैदानात आणि टी.व्ही. समोर बसलेल्या घरांमध्ये शांतता पसरली. स्कोअर बोर्डवर शुन्य दिसत होता. ३ स्टार तर बाद झालेले होतेच आणि विराट-राहूल यांच्या नावासमोर देखील शुन्य ठेवलेला होता. चाहत्यांच्या तोंडावर देखील शुन्य होता आणि संपूर्ण भारतात लाईव्ह मॅच सुरू असलेल्या टी.व्ही. संचावरही शुन्य होता. परंतु, या शुन्यातून विश्व कसे निर्माण करायचे हे विराट आणि राहूल या जोडीने इतके समर्पकपणे सांगितले की, हातातोंडाशी आलेला विजय या दोघांनी कसा हिसकावून घेतला ? या गुढकथेत सगळे कांगारू दिशाहीन होऊन गेले.
या पहिल्या विजयाने भारतीय संघाला जे गुण मिळवून द्यायचे असतात ते तर दिले आहेतच. परंतु, याचबरोबर विजयासाठीचा जो एक आत्मविश्वास यातून मिळाला आहे त्याचे मुल्य मोजमाप करता येणार नाही. भारतीय संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे आणि २०२३ च्या विश्वचषक विजेतेपदासाठी म्हणूनच भारतीय संघ दावेदार मानला जातो. या पहिल्या सामन्यात हे सप्रमाण सिध्द देखील झाले आहे. खरेतर, या सामन्यानंतर विराट किंवा राहूल यापैकी एकाची प्रशंसा करणे हा शुध्द मुर्खपणा होईल. दोघांनी या सामन्यात ज्या पध्दतीने हा मोडकळीस आलेला संसार सांभाळलाय तो दृष्ट लागण्याजोगा आहे. जिवदान मिळाल्यानंतर विराटने स्वतःला सावरलं. राहूलने त्याला धीर दिला. नंतर दोघांनी अजिबात घाई केली नाही. चेडू जास्त आहेत. त्यातून ज्या धावा बनवायच्या आहेत त्या कमी आहेत हे दोघांनी मनावर बिंबवून घेतल्यानंतर सर्वप्रथम धावसंख्या निम्यावर आणून ठेवली. इथवर सामना आल्यानंतर कांगारूंचा एकमेव स्पिनर असलेला आणि शेन वॉर्नचा वारसा समजला जाणाऱ्या ॲडम झांपाची हवा काढून घेतली. झांपा काय, मुंबई इंडीयन्सने चिक्कार पैशे देवून ज्याला आयपीएल संघात घेतला होता तो कॅमरून ग्रीन काय, पंजाब इलेव्हनची शान समजला जाणारा ग्लेन मॅक्सवेल काय किंवा पॅट कमीन्स काय…… एम.ए.चिन्नास्वामी मैदानावर सगळेच अपयशी ठरले आणि भलेमोठे वाटणारे छोटे टारगेट पुर्ण करून भारतीय संघाने हा सामना जिंकला.
काही महिन्यांपुर्वी एका बॅडपॅच मधून बाहेर पडल्यानंतर विराट हा जणू काही त्याचा संपूर्ण राग गोलंदाजांवर काढतो आहे. २०२२ साली सपशेल अपयशी ठरलेल्या के एल राहूलवर सोशल मिडीयात सडकून टिका झाली. त्याला दुखावतील असे प्रचंड ‘मिम्स’ व्हायरल झाले. २०२१ साली ८८.५ च्या सरासरीने वनडेत पोते भरुन धावा करणाऱ्या राहूलने २०२२ साली ९ वनडे सामन्यात मात्र २७.९ च्या सरासरीने अवघ्या २५१ धावा केल्यामुळे राहूलने प्रचंड टिका झेलली आहे. परंतु, त्याच्यावर टीम मॅनेजमेंटने विश्वास दाखविला. कसोटी आणि टी२० मध्ये ओपन करणाऱ्या राहूलची वनडेतली जागा मात्र निश्चित नाही. अगदी सलामीपासुन तर २ ते ६ क्रमांकापर्यन्त त्याच्यावर अनेक प्रयोग करुन झाले आहेत. परंतु आता पुनरागमन झाल्यापासून राहूलने मात्र गिअर बदलला आहे.
हा सामना भारतीय संघाने जिंकण्यात ऑस्ट्रेलियाची लाभलेली मदत देखील महत्त्वाची आहे. टॅास जिंकून प्रथम फंलदाजी घेणाऱ्या आॕस्ट्रेलियाची पहिली विकेट भलेही लवकर पडली होती. परंतु ७४ वर व्रॅार्नर आणि ११० धावसंख्येवर स्मिथ माघारी परतल्यानंतर जणू काही सारे संपल्यागत या संघाने नांगी टाकली आणि १९९ धावांवर गाशा गुंडाळला. यात रविंद्र जाडेजाची किमया अर्थातच महत्त्वाची ठरली. जाडेजाने स्टीव्हन स्मिथची उडवलेली उजवी बेल जाडेजा पेक्षा स्मिथच्या कायम लक्षात राहील. विश्वचषकाच्या मोहिमेचा शुभारंभ अशा पध्दतीने धडाक्यात झालेला आहे. आता पुढच्या प्रवासासाठी या विजयाचा ‘कैफ’ कसा वापरला जातो हे पाहणे मनोरंजक ठरेल.