नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येत श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आज होत असतांना उध्दव ठाकरे नाशिकमध्ये असणार आहे. यावेळी काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते पूजादेखील करणार आहेत. त्यानंतर गोदा घाटावर येऊन महाआरती करणार आहेत. तर दुस-या दिवशी राज्यस्तरीय अधिवेशनाते ते सहभागी होणार आहे. नाशिकमध्ये दर्शन, आरती व राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शनिवारीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिकला दाखल झाले असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या दौ-याची माहिती दिली. ते म्हणाले की,
उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये २२ जानेवारीला विमानाने दाखल होणार आहेत. ओझर विमानतळावर त्यांचे १ वाजता आगमन होईल. त्यानंतर ते भगूरला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर २ वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू हॉटेलकडे रवाना होतील. सायंकाळी ५.३० वाजता उद्धव ठाकरे काळाराम मंदिराकडे निघणार आहेत. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन ते पूजादेखील करणार आहेत. त्यानंतर ६.३० वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरतीदेखील करणार आहेत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी २३ तारखेला सायंकाळी ७ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन या सभेत अभिवादन करुन महाअधिवेशनाला सुरुवात होणार आहे.