इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अयोध्याः अयोध्येतील राम मंदिराच्या आज प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. आज अभिषेक झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. अभिषेक सोहळ्याला सुमारे आठ हजार आमंत्रित पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. यातील अनेकजण अति महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आठ हजार पाहुण्यांशिवाय इतर भाविकांची गर्दीही मंदिराभोवती असणार आहे. अशा परिस्थितीत येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्या पूर्णपणे छावणीत बदलली आहे.
शहरातील एंट्री पॉइंटपासून ते राम मंदिरापर्यंत प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस आणि एटीएस कमांडो तैनात करण्यात आले आहेत. सध्या अयोध्येत तुम्हाला ब्लॅककॅट कमांडो, चिलखती वाहने आणि ड्रोन दिसत आहे. शरयू नदीजवळ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके तैनात करण्यात आली आहे. अयोध्या रेड आणि यलो झोनमध्ये विभागली गेली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी येथे तीन पोलिस महासंचालक तैनात केले आहेत. एवढेच नाही तर सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी १७ आयपीएस, १०० पीपीएस स्तरावरील अधिकारी, ३२५ निरीक्षक, ८०० उपनिरीक्षक आणि १००० हून अधिक कॉन्स्टेबल तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी त्याची रेड झोन आणि यलो झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पीएसीच्या ३ बटालियन रेड झोनमध्ये तैनात आहेत, तर ७ बटालियन यलो झोनमध्ये तैनात आहेत. खासगी सुरक्षा एजन्सीही लक्ष ठेवणार आहे.
आज अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यासाठी पोलिसांशिवाय खासगी सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेतली जात आहे. खासगी सुरक्षा एजन्सी एसआयएसने अयोध्येत पदभार स्वीकारला आहे. अयोध्येत सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी आम्ही एआय तंत्रज्ञानाचीही मदत घेत आहोत. मंदिर परिसराजवळ कोणीही हिस्ट्रीशीटर आढळल्यास एआय तंत्रज्ञानाद्वारे काही सेकंदात कॅमेऱ्याद्वारे त्याची ओळख पटवली जाईल.