इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भव्य श्री रामजन्मभूमी मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधले गेले आहे. त्याची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट आहे; रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे; आणि या मंदिरात एकूण ३९२ खांब तर ४४ दरवाजे आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतींवर हिंदू देव, देवतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यात भगवान श्री राम (श्री रामलल्लाची मूर्ती) यांचे बालपणीचे रूप स्थापित करण्यात आले आहे.
मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे, सिंहद्वारातून ३२ पायऱ्या चढून या मंदिराकडे जाता येते. मंदिरात एकूण पाच मंडप (हॉल) आहेत – नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीताकूप) आहे, जी अति प्राचीन काळातील आहे. मंदिर परिसराच्या नैऋत्य भागात, कुबेर टिला येथे, भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून जटायूच्या शिल्पाची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिराचा पाया 14-मीटर जाड रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) च्या थराने बांधण्यात आला आहे, यामुळे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या उभारणीत कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही. जमिनीतील ओलाव्यापासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा वापर करून २१ फूट उंचीचा प्लिंथ बांधण्यात आला आहे. मंदिर संकुलात सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, अग्निसुरक्षेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र आहे. देशातील पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे.