इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रत्येक गावात वेगवेगळी परंपरा असते. त्यामागे अनेक कारणे असतात. पण, ही परंपरा नंतर पुढील पिढी पाळते हे विशेष आहे. कोकणातील वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावातही अशीच परंपरा पाळली जात आहे. साडेचारशे वर्षांपासून हे गाव पाच दिवस वेशी बाहेर राहणार आहे. आजही ही परंपरा पाळली जात असल्यामुळे पुढचे काही दिवस हे गाव वेशीबाहेर वसणार आहे.
विशेष म्हणजे हे गाव पाळीव प्राण्यांनाही घेऊन गेले आहे. गावाबाहेर जातांना हे सर्व गावकरी काही दिवसांसाठी लागणारा धान्याचा साठा घेऊन, गेले आहे. आता हे गावकरीशेजारच्या सडूरे गावाच्या हद्दीतील दडोबा डोंगराच्या पायथ्याशी हे राहुट्यामध्ये विसावले आहे. देवाला कौल लावून हुकूम घेतल्यानंतर सर्व लोक गावाच्या वेशीबाहेर पडतात. पुन्हा गावात जाण्यासाठीसुद्धा देवाला कौल घेतला जातो. देव गांगोचा हुकूम मिळेपर्यंत लोक गावाच्या बाहेर राहतात. काही वेळा तीन, पाच, सात दिवस लोक गावाबाहेर राहतात.
तळकोकणातील काही गावांत ही गावपळणीची प्रथा पाळली जात आहे; मात्र शिराळे गावातील हे दृश्य पाहिले, की गावात घरे असूनही गाव निर्मनुष्य का असा प्रश्न सर्वांनाच पडतो. प्रथेनुसार गावकरी वर्षातून एकदा गाव सोडतात आणि त्या काळात काहीही झाले, तरी लोक गावात थांबत नाही. या काळात जनावरे, पाळीव प्राणी, कोंबड्या, गुरे, ढोरे आदी सर्वांना गावाबाहेर राहावे लागत आहे. या गावपळणीसाठी चाकरमानी, माहेरवाशिणी आवर्जून येत असतात. गावपळणीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमानीदेखील जिथे कुठे असतील, तिथून गावाला येतात.