अमळनेर- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे भूषविणार आहेत. या संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार असून त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत. तर समारोपाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना.दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
दि. २ रोजी सकाळी ७.३० वा. ग्रंथदिंडीचे उद्घाटन महमंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व अशोक जैन यांच्या हस्ते होईल. १० वाजता प्रा.उषा तांबे ध्वजारोहण करतील. ग्रंथदालनाचे उद्घाटन पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर तर प्रकाशनकट्टा उद्घाटन प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते होईल. सभामंडप क्रमांक १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी १०.३० वाजता साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होईल. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे, पूर्व संमेलनाध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, विशेष अतिथी म्हणून भाषा व शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
दुपारी २ ते ३.३० वाजे दरम्यान बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. दुपारी ३.३० ते ५.३० दरम्यान राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० ते ८.३० वाजे दरम्यान कविसंमेलन पार पडेल. रात्री ८.३० ते १०.३० वाजे दरम्यान छंद विठ्ठलाचा – भावसरगम हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.
सभामंडप क्र. २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दि.२ रोजी दुपारी २.०० ते ३.३० दरम्यान कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक, दुपारी ३.३० ते ४.३० सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान, दुपारी ४.३० ते ५.३० वा. तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान, सायं. ५.३० ते ७.०० वा स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान या विषयांवर परिसंवाद होतील. सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.२ रोजी दुपारी ३.०० ते ७.०० कविकट्टा पार पडेल.
दि.३ रोजी सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी ९.३० ते ११.०० वा पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची प्रकट मुलाखत होईल. रवींद्र गोळे (मुंबई), सारंग दर्शन (मुंबई) हे मुलाखत घेतील. सकाळी ११.०० ते १२.३० वा आजच्या मराठी साहित्यातून जीवन मूल्ये हरवत चालली आहेत का? दुपारी १२.३० ते २ वाजे दरम्यान अलक्षित साने गुरुजी या विषयावर परिसंवाद होईल. यावेळी श्रीमती सुधा साने यांचा सत्कार व मनोगताचा कार्यक्रम पार पडेल. दुपारी २.०० ते ३.३० वा आंतरभारती काल-आज-उद्या, सांय. ४.०० ते ५.३० वा आठवणीतल्या कविता – रसास्वाद या विषयांवर परिसंवाद होतील. सांय. ६.०० ते ८.०० : कविसंमेलन होईल. रात्री ८.०० ते १० वा “अरे संसार संसार” : कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या रचनांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल.
सभामंडप क्र २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दि. ३ रोजी सकाळी १०.०० ते ११.०० वा ग्रामीण विकासाचे अर्थकारण व नियोजन विषयावर चैत्राम पवार यांची मुलाखत शशिकांत घासकडबी, नंदुरबार घेतील. सकाळी ११.०० ते १२.३० वा मराठी साहित्यात विनोदाचे गांभीर्याने चिंतन होणे आवश्यक आहे, दुपारी १२.३० ते १.३० वा. खान्देशी बोलीभाषा (अहिराणी, तावडी, भिल्ली, लेवा गणबोली, गुर्जर) या विषयांवर परिसंवाद होतील. दुपारी १.३० ते ३.३० वा. कथाकथन होईल. दुपारी ४.०० ते ५.३० वा. कळ्यांचे निश्वास या विषयावर परिचर्चा होईल.
सभामंडप क्र. ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.३ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० व दुपारी ११.३० ते २ वा. कविकट्टा पार पडेल. दुपारी २.३० ते ४.३० वा लोककला / लोकसंगीताचा कार्यक्रम होईल. दुपारी ४.३० ते ६ वा खान्देशी साहित्यिकांचे वैभव यावर परिसंवाद होईल. सायं. ६.०० ते ८.०० : खान्देशी कविसंमेलन होईल.
दि.४ रोजी सभामंडप क्र १ खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी व्यासपीठावर सकाळी ९.०० ते १०वा चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत दीपाली केळकर (बदलापूर) घेतील. सकाळी १०.३० ते १२ वा अभिरूप न्यायालय होईल. यात अभिजात मराठी भाषेचा योग्य उपयोग करण्यासाठी मराठी व्यवहाराची विविध क्षेत्रे सज्ज आहेत का ? हा विषय असेल. दुपारी १२.०० ते १ वा मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी ३.०० ते ३.३० लेखिका डॉ. मीना प्रभू-पुणे, लेखक डॉ. विश्वास पाटील-शहादा प्रकाशक-चंद्रकांत लाखे नागपूर, अथर्व पब्लिकेशन्स्, जळगांव यांचा सत्कार होईल. दुपारी ४.०० ते ६.०० : खुले अधिवेशन व समारोपाचा कार्यक्रम संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाषा मंत्री दीपक केसरकर उपस्थित राहणार आहेत.
सभामंडप क्र २ कविवर्य ना. धों. महानोर सभागृहात दि.४ रोजी सकाळी ९.३० ते ११.०० : वर्तमान तंत्रज्ञानावर आधारित मराठी, सकाळी ११.०० ते २ वा साहित्यिकांचे शताब्दिस्मरण, दुपारी २.०० ते ३.३० वा भारतीय तत्त्वज्ञान एक वैभवशाली संस्कृती या विषयांवर परिसंवाद होतील. सभामंडप ३ बालकवी – त्र्यंबक बापूजी ठोंबरे सभागृहात दि.४ रोजी सकाळी ९.०० ते २ वा गझलकट्टा होईल. सायं. ७.०० ते ९ वा. मुख्य सभागृहात समारोपाच्या दिवसाचा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य “जाऊ देवाचिया गावा” हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडेल.
संमेलनपूर्व कार्यक्रम
संमेलनपूर्व कार्यक्रमात दि. १ रोजी सकाळी १०.३० वा बालसाहित्य संमेलनाने कार्यक्रमाला सुरुवात होईल. याचे अध्यक्षस्थान अ.भा.मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे भुषवतील. बालमेळावा समन्वयक म्हणून एकनाथ आव्हाड जबाबदारी सांभाळतील. यावेळी बालमेळावा अध्यक्ष शुभम सतीष देशमुख, चाळीसगांव, बालमेळावा उद्घाटक पियुषा गिरीष जाधव, जळगांव व बालमेळावा स्वागताध्यक्ष दीक्षा राजरत्न सरदार, अमळनेर व्यासपीठावर उपस्थित राहतील. दुपारी १ ते २ वाजेदम्यान कथाकथन सत्र विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. दु. २ ते ३ वाजे दरम्यान काव्यवाचन सत्र आबा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली, दुपारी ३.३०.४.३० वा. बालनाट्य सत्र माया धुप्पड यांच्या अध्यक्षतेखाली तर सायं. ४.३०.५.३० वा. नाट्यछटा सत्र प्रकाश पारखी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल. दुपारी ०४.०० वा. साहित्याची वारी… रसिकांच्या दारी हा कार्यक्रम देखील पार पडेल.