नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा आणि प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात शुक्रवारी (दि.१९) रात्री कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेत गंभीर गुन्हे दाखल असणा-या आणि तडिपार अशा एकूण १२३ जणांची तपासणी करण्यात करण्यात आली. गुन्हेगारांच्या घर झडतीत तीन शस्त्रे मिळून आली असून ती जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल असणारे गुन्हेगार, समाजकंटक यांची तपासणी, फरार आरोपींचा शोध, टवाळखोरांविरोधातील कारवाईसाठी परिमंडळ दोन अंतर्गत रात्री चार तास कोम्बिंग मोहीम राबविण्यात आली. पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, व डॉ. सचिन बारी यांनी पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन परिणामकारक मोहीम राबविली. या अंतर्गत १२३ शरीराविरुध्द गुन्हे दाखल असणारे तसेच तडिपार गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. गुन्हेगारांचे चौकशी अर्ज भरून घेण्यात आली. या मोहिमेत १७२ टवाळखोरांविरुध्द कारवाई करण्यात आली.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांच्या घरझडतीत तीन धारदार शस्त्रे मिळून आली असून ती जप्त करण्यांत आली आहेत. चार जणांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले. दारूबंदी कायदयान्वये इंदिरानगर व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात साडेआठ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. रेकॉर्डवरील मालाविरुध्द, शरिराविरुध्दचे गुन्हेगार, तडीपार तसेच घातक हत्यारे, अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करुन दहशत निर्माण करणारे गुन्हेगारांना अचानकपणे कोम्बिंग, आॅलआउट, नाकाबंदी आदी कारवाई करून, घडझडत्या घेऊन तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करुन गंभीर गुन्हे उघडकीस आणून अटक करण्याची कारवाई यापुढेही सुरु राहणार असल्याचे शहर पोलिसांनी म्हटले आहे.
.