इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शहरातील कापड बाजार येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ब्रह्मोत्सवाचे (नवरात्रोत्सव) आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून कोजागरीपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाचा नाशिककरांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थानातर्फे करण्यात आले आहे..
या ब्रह्मोत्सवामध्ये आज मंगळवार (दि.१०) रोजी म्हणजेच इंदिरा एकादशीच्या दिवशी सकाळी दहा वाजता विमानोत्सव (देवाचा जन्मोत्सव) साजरा करण्यात येणार आहे. या एकादशीच्या दिवशी मूळ पुरुष गणपती महाराजांना श्री व्यंकटेश बालाजींनी तिरुमालामधील ताम्रपर्णी नदीमध्ये मूर्ती स्वरूपात दर्शन दिले आणि एकादशीच्याच दिवशी श्री व्यंकटेश बालाजी श्रीदेवी भुदेवी सहित विमानावर बसून तिरुपतीच्या पर्वतावर अवतरले. म्हणून या सोहळ्याला विमानोत्सव असे म्हटले जाते, अशी आख्यायिका आहे.
आज मंगळवार रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी ऍडव्होकेट हर्षवर्धन बालाजीवाले यांनी केले आहे.