नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयोध्या येथे सोमवारी (दि. २२) राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील श्री काळाराम मंदिरासह शहरातील सर्वच ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरती, धार्मिक सोहळे, प्रवचन, ठिकठिकाणी सेलिब्रेशन होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व पोलिस ठाण्यांसह गुन्हे पथकांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील सर्व ठिकाणी गस्त वाढवून मंदिरांलगत बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
यासह शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे नाशिक दौ-यावर आहेत. काळाराम मंदिरात आरतीसह सातपूर हद्दीत ठाकरे गटाचे महाअधिवेशन आहे. तसेच गोल्फ क्लब मैदानात ठाकरे यांची सभादेखील होणार आहे. त्यासंदर्भातही संबंधित पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा व वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नेमला आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलनासाठी नाशिकमधूनही शेकडो बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत.
नाशिकमार्गे इतर जिल्ह्यातून आलेले बांधव मुंबईकडे जातील. त्यामुळे महामार्गासह सर्व भागात योग्य बंदोबस्त ठेवत गस्त वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे.