नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महापालिकेच्या कंत्राटात अपहार केल्याच्या आरोपात शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना पुन्हा जिल्हा व सत्र न्यायालयाने चार दिवसांचा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांच्या अंतरिम अटकपूर्व जामिनास मुदतवाढ दिल्याने आता बुधवारी (दि.२४) अंतीम सुनावणी होण्याची शक्यता आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फियार्दीनुसार, सुधाकर बडगुजर यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत अपहाराचा गुन्हा नोंद आहे. याप्रकरणी २२ डिसेंबर रोजी एसीबी कार्यालयात बडगुजरांची चौकशी झाली होती. तर २९ डिसेंबरपासून त्यांना अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. या अर्जावरील सध्या सुनावणी सुरू आहे. त्यानुसार शनिवारी (दि. २०) संशयित बडगुजर, रामदास शिंदे व सुरेश चव्हाण या तिघांचा अंतरिम जामीन नियमित करण्यासाठी वकील अविनाश भिडे आणि एम.वाय. काळे यांचा युक्तिवाद पूर्ण झाला.
तर सरकारी पक्षातर्फे वकील पंकज चंद्रकोर यांनी महत्त्वाचे पुरावे सादर केले. दरम्यान, यापूर्वी युक्तिवादात बडगुजर यांनी कंपनीच्या नावे घेतलेले कर्ज, जागा खरेदी, वाहन खरेदी यासह इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले असून आज त्याबाबत कागदपत्र सादर केली. तर बचाव पक्षाच्या वतीनेही जोरदार युक्तिवाद करुन काही कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यामुळे आता २४ जानेवारी होणाºया सुनावणीकडे दोन्ही पक्षाचे लक्ष आहे.