इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाणे : गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे विशेषता बँकांची फसवणूक करून कोट्यावधीची मालमत्ता हडप करण्याचा प्रकार देशभरात अनेक ठिकाणी उघड होत असल्याने बँकांपुढे सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच आता ठाणे जिल्ह्यात एक भयानक फसवणुकीचा प्रकार उघड झाला असून या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्याने पेमेंट गेटवे सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे बँक खाते हॅक करून विविध बँक खात्यांमधून तब्बल १६ हजार १८० कोटींचे व्यवहार केले आहेत, त्यातच सुमारे २५ कोटींची फसवणूक झाल्याचा गैरप्रकार उघड झाल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने देण्यात आली.
मोठे रॅकेट असण्याची शक्यता
वास्तविक फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीने भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, ठाण्यातील श्रीनगर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. त्याच आधारे ठाणे सायबर विभागाने याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनुसार एप्रिल २०२३ मध्ये कंपनीचे पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून २५ कोटी काढल्याचा आरोप आहे. याच तपासात १६ हजार १८० कोटींची उलाढाल झाल्याचेही उघड झाले आहे. तसेच
कोट्यवधींची रक्कम परदेशात पाठवल्याची
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार कळते, यातील दोन आरोपींनी रियल इंटरप्राइजेस या कंपनीच्या वाशीच्या आयडीएफसी या बँक खात्यावरून काही आर्थिक व्यवहार केले आहेत. याप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल झाला असून ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन, केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि अन्य एका अज्ञात व्यक्तींविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.