नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार दि. 08.10.2023 रोजी घेण्यात आलेल्या “विस्तार अधिकारी (सांख्यिकी)” आणि दि. 10.10.2023 रोजी घेण्यात आलेल्या “आरोग्य पर्यवेक्षक” या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर शनिवार दि. 20.01.2024 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहिर करण्यात आला असून तो नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेने दि. 05 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरात क्र. 1/2023 मधील “विस्तार अधिकारी (सांख्यिकी)” या पदाच्या 2 जागांकरिता दि. 08.10.2023 रोजी आयबीपीएस (इंस्टीट्युट ऑफ बँकींग पर्सोनेल सिलेक्शन, मुंबई ) या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेला एकूण 337 परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यापैकी 300 परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. त्यापैकी 200 गुणांच्या परीक्षेत किमान 45 टक्के म्हणजे 90 गुण प्राप्त करणाऱ्या 221 परीक्षार्थींचा निकाल घोषित करण्यात आला आहे.
तसेच “आरोग्य पर्यवेक्षक” या पदाच्या 3 जागांकरिता दि. 10.10.2023 रोजी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला एकूण 91 परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यापैकी 73 परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. त्यापैकी 200 गुणांच्या परीक्षेत किमान 45 टक्के म्हणजे 90 गुण प्राप्त करणाऱ्या 22 परीक्षार्थींचा निकाल घोषित करण्यात आला आहे.
नाशिक जिल्हा परिषदेकडून दि. 05 ऑगस्ट 2023 रोजी एकूण 20 संवर्गामधील 1038 रिक्त पदांकरिता जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार दि. 26.12.2023 पर्यंत 15 संवर्गाकरिता ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली असून कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य सेवक 40 टक्के (पुरुष), आरोग्य सेवक 50 टक्के (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका या 5 संवर्गांच्या परीक्षा नियोजित असून शासनाच्या मान्यतेनुसार घेण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी श्री जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्यात. यासाठी भरारी पथक प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता “व्हेन्यु ऑफिसर” व सहाय्यक अधिकारी यांची नियुक्त्या करण्यात आल्या होत्या.
परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्त, नाशिक व पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडून पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता व परीक्षेच्या दिवशी अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्याकडून अखंड वीज पुरवठा करण्यात आला होता. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्याच्या आरोग्यासाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या व सर्व परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यात आल्यात, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.