नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. या चोरीत सोन्याचांदीचे दागिणे रोकड व लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी नाशिकरोड,इंदिरानगर व अंबड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली घटना एक्स्लो पॉईंट भागात घडली. याबाबत संजय हरिश्चंद्र उपाध्याय (रा.डीजीपीनगर,कामटवाडे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. उपाध्याय यांचे अंबड लिंकरोड भागात श्रीसाई मशिन टूल्स नावाचे दुकान आहे. गुरूवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे लॉक तोडून व पत्रा उचकटून कॉम्प्रेसर मशिन व पिलर ड्रील मशिन असा सुमारे ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
तर दुस-या घटनेत मुंबईस्थीत सलमा रेवाकांत साळवे यानी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साळवे कुटुंबिय दोन दिवस बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शिंदे गावातील कडवा कॉलनीमधील २० खोल्यांच्या समोर असलेले त्यांच्या बंद घराचे मागील दरवाजाची कडी उघडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ४० हजाराची रोकड चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.
तिस-या घटनेत तानाजी रामसिंग जाधव (रा.गोविंदनगर) यांनी पहिली तक्रार दाखल केली आहे. जाधव इलेक्ट्रीक पार्ट सप्लायर्स असून त्यांचे पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगर भागात ऑफिस आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी (दि.१८) रात्री इंद्रायणी रो बंगला येथील कार्यालयाचे कुलूप तोडून दोन लॅपटॉप व गल्यातील रोकड चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे करीत आहेत.