नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्यात येणार असून याचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करणार आहे.
येत्या २२ जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहरातील प्रत्येक मंदिरात दीप प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्यात येणार आहे. तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. प्रत्येक घराघरात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. हा सोहळा ‘याचि देही, याचि डोळा’ पाहण्यासाठी देशा-विदेशातून भाविक हजेरी लावत आहेत.
यासाठी २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशा विदेशातील अनेक प्रतिष्ठितांना निमंत्रित करण्यात आलंय. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त प्रतिष्ठित आणि साधू-संत या सोहळ्यासाठी निमंत्रित आहेत. नाशिक मध्ये प्रभू रामचंद्र वनवासा करिता होते. याकरिता नाशिकचे वेगळे महत्व असल्याने अयोध्येत जाणे शक्य नसलेले नाशिकमध्ये विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहे. नाशिक शहर सुंदर दिसावे. प्रत्येकांच्या नजेरेत भरावे याकरिता युवक राष्ट्रवादी देखील पुतळ्यांची साफसफाई करणार आहे.
अयोध्यामध्ये मर्यादा पुरूषोत्तम प्रभु श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम प्रत्येक भारतीयांकरीता एक अविस्मरणीय दिवस असल्याने नाशिक शहरातील विविध मंदिर परिसरात एलइडी स्क्रीन लावून लाइव प्रसारण करण्यात येणार आहे. शहरात सार्वजनिक दीपावली साजरी होत असताना सर्व मंदिरात, मुख्य रस्त्यांवर, सार्वजनिक परिसरात, प्रत्येक घराघरात साफसफाई केली जात आहे. याचाच भाग म्हणून युवक राष्ट्रवादी शहरातील प्रत्येक महापुरुषांच्या पुतळ्याची साफसफाई करणार असल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले.