वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे सर्वांना वेध लागले आहे. या सोहळ्यात सर्वांना जाणे शक्य नाही. त्यामुळे त्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. पण, हा सोहळा जर थिएटरमध्ये बघायला मिळाला तर प्रत्यक्ष सोहळयात असल्याचा अनुभव मिळणार आहे. PVR-आयनॉक्स या देशातील अग्रगण्य थिएटर चेनने हा सोहळा थिएटरमध्ये दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पीव्हीआरने आज तक या वृत्तवाहिनीशी करार केला असून त्यामुळे देशभरातील ७० शहरांमधील १६० चित्रपटगृहांमध्ये या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
२२ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ दरम्यान हा सोहळा थिएटरमध्ये बघता येणार आहे. यासाठी केवळ १०० रुपयांचे तिकीट आकारले जाणार आहे. या किंमतीत दर्शकांना पॉपकॉर्न आणि बेव्हरेज कॉम्बो देखील मिळणार आहे.
खरं तर हा ऐतिहासिक सोहळा असल्यामुळे त्याचा अनुभव देखील भव्य असायला हवा. चित्रपटगृहाच्या पडद्यावर हा सोहळा पाहिल्यामुळे तो अधिक जिवंत वाटणार आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून भाविकांशी जोडले जाणे हे आमचे सौभाग्य असेल असे पीव्हीआर-आयनॉक्स लिमिटेडचे को-सीईओ गौतम दत्ता यांनी सांगितले. मंदिरात सुरू असणारा मंत्रजागर, तिथली दृश्ये आणि तिथले वातावरण हे थिएटरमध्ये लोकांना अनुभवता यावे हा आमचा प्रयत्न असणार आहे. हे मनोरंजन नसेल, तर भाविकांना तो क्षण जगता यावा यासाठीचा प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले.