नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, शालेय आणि उच्च शिक्षणांतर्गत सर्व अभ्यासक्रमांसाठीचे अभ्यास साहित्य संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भारतीय भाषांमध्ये डिजिटल स्वरूपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. शिक्षण मंत्रालयाने आज जारी केलेल्या आदेशात, सरकारने सर्व शालेय आणि उच्च शिक्षण नियामक जसे UGC, AICTE, NCERT, NIOS, IGNOU आणि IITs, CUs तसेच NIT सारख्या राष्ट्रीय महत्वाच्या संस्था प्रमुखांना पुढील तीन वर्षांत सर्व अभ्यासक्रमांचे अभ्यास साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. UGC, AICTE आणि शालेय शिक्षण विभागाला देखील राज्यातील शाळा आणि विद्यापीठांच्या संदर्भात याबाबत पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या शिफारशींमधून प्रत्येक स्तरावर शिक्षणात बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वरील दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत अभ्यास करण्याची संधी मिळेल आणि चांगले अध्ययन परिणाम मिळू शकतील. स्वतःच्या भाषेत अभ्यास केल्याने विद्यार्थ्याला भाषेच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय नाविन्यपूर्ण विचार करण्याची नैसर्गिक संधी उपलब्ध होऊ शकते.
भारताचे बहुभाषिक स्वरूप ही त्याची मोठी संपत्ती आणि सामर्थ्य असून त्याचा राष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी कार्यक्षमतेने वापर करणे आवश्यक आहे अशी कल्पना नवे शैक्षणिक धोरण-2020 ठामपणे व्यक्त करते. स्थानिक भाषांमध्ये आशय निर्मितीमुळे या बहुभाषिक संपत्तीला चालना मिळेल आणि 2047 पर्यंत आपल्या देशाला विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी ‘विकसित भारत’ मोहीमेत अधिक चांगल्या योगदानाचा मार्ग मोकळा करेल.
‘अनुवादिनी’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲपद्वारे अभियांत्रिकी, वैद्यकीय, कायदा, स्नातक, स्नातकोत्तर आणि कौशल्य या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांच्या भाषांतराद्वारे सरकार गेल्या दोन वर्षांपासून या दिशेने काम करत आहे. ही पुस्तके ई कुंभ पोर्टलवर उपलब्ध आहेत. शालेय शिक्षण परिसंस्थेमध्ये देखील दिक्षा पोर्टलवर 30 पेक्षा जास्त भारतीय भाषांमध्ये अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. JEE, NEET, CUET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा देखील 13 भारतीय भाषांमध्ये घेतल्या जातात.