निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठ दिवसांपासून निफाड तालुक्यातील नांदुर्डी परिसरात संचार करत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात १९ रोजी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असल्याची माहिती वनविभागाने दिली.
नांदुरी येथील खापरे वस्तीवरील अंबादास निवृत्ती खापरे, कैलास नारायण खापरे यांच्या शेतात बिबट्या संचार करत असल्याचे भर दिवसा शेतकऱ्यांना आढळले होते. शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर भरदिवसा हल्ला करण्याचा प्रयत्न देखील या बिबट्याने केला होता. परिसरात या घटनेमुळे धास्तीचे वातावरण निर्माण झालेले होते.
त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने या परिसरात पिंजरे लावले होते. १९ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास छगन तुकाराम राऊत यांच्या वस्तीवर हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास त्याच्या नैसर्गिक अधीवासात सोडले जाणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.