नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसरी गावात वाहन पार्किंगचा वाद मिटविणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. संतप्त टोळक्याने मारहाण करीत दोघांवर प्राणघातक हल्ला केला असून या हल्यात धारदार शस्त्राचा वार करण्यात आल्याने तरूण जखमी झाले आहेत. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ह-या उर्फ हर्षद त्रिभूवन, त्याचा मामा, भाऊ, सुशिल सुतार व तीन ते चार मित्र (रा.सर्व संसरीगाव) अशी तरूणांवर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत सागर धनंजय गोडसे (२७ रा. गांडूळी मळा,संसरीगाव) या तरूणाने फिर्याद दिली आहे. सागर गोडसे व जखमी कुणाल बाजीराव गोडसे (२३ रा.संसरीगाव) हे दोघे मित्र बुधवारी (दि.१७) रात्री संसरी गावातील वैष्णव किराणा दुकानासमोरून जात होते.
या ठिकाणी पोलीस रेकॉर्डवरील संशयित ह-या त्रिभुवन याचा रस्त्यावर उभे असलेले वाहन काढण्यावरून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी दोघे मित्र गेले असता ही घटना घडली. संतप्त संशयितांनी दोघा मित्रांना शिवीगाळ व दमदाटी करीत लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास उपनिरीक्षक लियाकत पठाण करीत आहेत.