नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सराफ व्यावसायीकास साडे चार लाख रूपयाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. महापालिकेच्या वृक्षतोडीच्या ठेक्यात भागीदार करण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष नारायण आहेर (रा.विजयप्रेम अपा.शामाप्रसाद रोड चांडक सर्कल तिडके कॉलनी) असे संशयिताचे नाव आहे. याबाबत किशोर गोपालराव घोडके (रा.घोडेबाबानगर,काठेगल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. सराफ व्यावसायीक घोडके यांची संशयिताने २०२२ मध्ये भेट घेतली होती. नाशिक महापालिकेने वृक्षतोडीच्या कामाचा कुठलाही ठेका काढलेला नसतांना संशयिताने हा ठेका मिळत असल्याचे भासवून घोडके यांना भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी तयार केले.
घोडके यांचा विश्वास संपादन करीत संशयिताने ठेका मिळविण्यासाठी अनामत रक्कमची मागणी केली. त्यानुसार ७ ऑक्टोबर रोजी घोडके यांनी साडे चार लाखाची रक्कम सुपूर्द केली असता ही फसवणुक झाली. खोटे सांगून अनामत रक्कम भरण्याच्या बहाण्याने संशयिताने वरिल रक्कम घेतली होती. वर्ष उलटूनही रक्कम परत न केल्याने घोडके यांनी पोलीसांनी धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक दिपक तोंडे करीत आहेत.