इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली- बिल्किस बानो प्रकरणात दोषींनी आत्मसमर्पण कालावधी वाढवण्याची मागणी केली होती. त्यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला. सर्व दोषींच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत.
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना यांच्या खंडपीठाने सर्व याचिका फेटाळून लावल्या आणि दोन आठवड्यांच्या आत आत्मसमर्पण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, असे बजावले. सर्व याचिका बिनबुडाच्या असून, आम्ही शरणागतीची तारीख वाढवू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्व दोषींना २१ जानेवारीला आत्मसमर्पण करावे लागणार आहे.
बिल्किस बानो प्रकरणातील ११ दोषींनी सर्वोच्च न्यायालयासमोर त्यांच्या स्वत: च्या आरोग्याबरोबरच त्यांच्या वृद्ध आईवडिलांसह अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा उल्लेख केला होता.२००२ च्या गुजरात दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी हे सर्व दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते; परंतु ऑगस्ट २०२२ मध्ये गुजरात सरकारने त्यांची शिक्षा माफ केली होती. ११ दोषींमध्ये बकाभाई वोहनिया, बिपिनचंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, गोविंद जसवंत नई, मितेश भट्ट, प्रदीप मोरधिया, राधेश्याम शाह, राजूभाई सोनी, रमेश चंदना आणि शैलेश भट्ट यांचा समावेश आहे.