नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने एमडीची विक्री करण्यासाठी आलेल्या व शस्त्रबंदीच्या गुह्यात पसार असलेल्या टिप्पर गँगच्या सदस्यासह अन्य एकास गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून सुमारे एक लाख रूपये किमतीचे २० ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे. ललीत पाटीलच्या एमडी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या मॅफेड्रॉन या अमली पदार्थाची शहरात पुन्हा राजरोस विक्री सुरू असल्याचे पोलीस कारवाईतून समोर आले आहे.
याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील बाळू पगारे (२९ रा.दादाज अपा.विक्री भवन समोर पाथर्डी फाटा) व कुणाल उर्फ घा-या संभाजी घोडेराव(रा.भगवतीचौक,उत्तमनगर सिडको) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून त्यातील निखील पगारे हा नामचिन टिप्पर गँगचा सदस्य आहे.
शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकास टिप्पर गॅगचा निखील पगारे हा पाथर्डी शिवारातील दामोदर नगर भागात अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा लावला असता संशयितासह घोडेराव हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे पोलीसांच्या हाती लागले. संशयितांच्या अंगझडतीत एक लाख रुपये किमतीची २० ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर मिळून आली.
याप्रकरणी पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक निरीक्षक हेमंत फड करीत आहेत. ही कारवाई आयुक्त संदिप कर्णीक,उपायुक्त प्रशांत बच्छाव,सहाय्यक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे व युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,हेमंत नागरे, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार शरद सोनवणे,महेश साळुंके,योगीराज गायकवाड,धनंजय शिंदे,रमेश कोळी पोलीस नाईक मिलींदसिंग परदेशी अंमलदार विलास चारोस्कर,राहूल पालखेडे,जगेश्वर बोरसे,अमोल कोष्टी,नितीन जगताप राजेश राठोड मुक्तार शेख,आप्पा पानवळ,अनिरूध्द येवले व चालक किरण शिरसाठ आदींच्या पथकाने केली.