इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढत्या दौ-यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मोदीजी आज राज्यात आहेत, राज्यातले मोदी साहेबांचे वाढते दौरे बघता मागील काळात आलेले सर्व्हे भाजपने चांगलेच गांभीर्याने घेतलेले दिसतात आणि त्यासाठीच पक्ष-कुटुंब फोडणे, तपास यंत्रणा यांसारखे साम, दाम, दंड, भेद हे सर्व मार्ग अवलंबून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
‘विकासपुरुष’ ही पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा आहे आणि याच प्रतिमेला बघून अनेक जण भाजपवासी झाले असल्याचे सांगतात. आज राज्यात कापसाला भाव नाही, निर्यातीच्या धोरणामुळे कांदा, सोयाबीन, द्राक्ष, तूर उत्पादक शेतकरी हताश आहे. पेपरफुटी, रखडलेली भरती प्रक्रिया, बेरोजगारी यामुळे युवा वर्ग निराशेच्या गर्तेत आहे.
अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य कमर्चारी, कंत्राटी कर्मचारी यासारखे अनेक घटक आज आंदोलने करत आहेत. मराठा-धनगर-मुस्लीम-लिंगायत आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, परंतु या सर्व प्रश्नाकडे राज्यसरकारच्या धुरिणांचे लक्ष जात नाही.
हे राज्य सरकार महाराष्ट्राच्या मनाची बात कधी करणार नाही. त्यामुळं आदरणीय मोदी साहेब आज आपण महाराष्ट्रात आहात तर अस्वस्थ आणि रखरखत्या महाराष्ट्राच्या मनाची बात आपण करावी ही मराठी मनाची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा आपण नक्की पूर्ण कराल ही आशा आहे. असे त्यांनी म्हटले आहे.