इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत शेतकऱ्याचा मुलगा राज्यात प्रथम आला. विनायक नंदकुमार पाटील असे त्याचे नाव आहे. त्याला ६२२ गुण मिळाले. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला.
धनंजय बांगर ६०८ गुणांसह एकुणात दुसरा, तर सौरभ गावंदे (६०८) याने तिसरा, गणेश दत्तात्रय दिघे (६०५) चौथा तर शुभम गणपती पाटील (६०३) याने पाचवा क्रमांक मिळवला. उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक आणि तहसीलदार या संवर्गातील ६२३ जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. गुरुवारी या मुलांच्या मुलाखती झाल्यानंतर काही तासातच अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने राज्यात पहिला क्रमांक मिळवला. त्याचे वडील शेती करतात. दुसऱ्याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. पहिल्या प्रयत्नात उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्याची निवड झाली होती.
अवघ्या एक तासात गुणवत्ता यादी जाहीर
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२२ मुलाखतीचा कार्यक्रम संपल्यानंतर केवळ एका तासाच्या अवधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली. या परीक्षेच्या अंतिम निकालाच्या आधारे गट-अ व गट-ब संवर्गातील विविध पदांकरीता ६२३ उमेदवार शिफारसपात्र ठरु शकतील.