नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) ‘- खासगी लहान वाहनांना टोलमाफी आहे’ असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ते धादांत खोटं आहे. इथून पुढे महाराष्ट्र सैनिक टोलनाक्यावर उभे राहतील आणि खासगी वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही आणि जर टोलवाल्यांनी बळजबरी केली तर आम्ही टोलनाके जाळून टाकू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिल्यानंतर अवघ्या काही तासात मनसैनिकांनी टोल नाके गाठत आंदोलन केले.
यावेळी खासगी लहान वाहनांना विना टोल सोडली. राज्यभर हे ठिकठिकाणी आंदोलन झाले. नाशिक जिल्ह्यात नाशिक व चांदवड येथे आंदोलन करण्यात आले. नाशिक येथे मनसैनिक व पदाधिकारी यांनी टोल गाठत आंदोलन केले.
त्यानंतर चांदवड येथे आंदोलन करण्यात आले. चांदवड येथील सोमा टोल कंपनीच्या टोल नाक्यावर मनमाड, चांदवड, येवला येथील मनसे सैनिकांनी आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी टोल नाका बंद पाडत या मार्गाने जाणा-या वाहनांना टोल न देता मोफत सोडत आंदोलन केले. मनसेच्या या आंदोलनामुळे अनेक छोट्या वाहनांसह मोठी वाहन टोल न भरताच मार्गस्थ झाली..