नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री राम जन्मभूमीशी संबंधित सहा विशेष टपाल तिकिटे जारी केली, त्याशिवाय, याआधी प्रभू रामाशी संबंधित घटनांबद्दल, जगातील इतर देशांनी जारी केलेल्या टपाल टिकीटांचा अल्बम (संग्रह) देखील त्यांनी जारी केला. भारत आणि परदेशातील सर्व राम भक्तांचे त्यांनी अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, आपल्या सर्वांना माहित आहे की ही टपाल तिकिटे पत्रे किंवा महत्त्वाची कागदपत्रे पाठवण्यासाठी लिफाफ्यांवर चिकटवली जातात. पण त्यासोबतच, ही तिकिटे आणखी एक उद्देशही साध्य करतात. कुठल्याही ऐतिहासिक घटना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून ही टपाल तिकिटे काम करतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही कोणाला टपाल तिकीट लावलेले पत्र किंवा वस्तू पाठवता, तेव्हा तुम्ही त्यासोबत, त्यांना इतिहासाचा एक तुकडा देखील पाठवत असता. ही तिकिटे केवळ कागदाचा तुकडा नसून इतिहासाची पुस्तके, कलाकृती आणि ऐतिहासिक स्थळांचे माहिती, याचे एक अति लघु रूपच आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
या संस्मरणीय टपाल तिकिटांमुळे आपल्या तरुण पिढीला प्रभू राम आणि त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेण्यास मदत होईल, असे पंतप्रधान म्हणाले. या टपाल तिकिटांवरील कलात्मक अभिव्यक्तीतून, भगवान रामाविषयीची भक्ती व्यक्त केली गेली आहे, असे सांगत,:’मंगल भवन अमंगल हारी’ हे कवन उद्धृत करून, त्याद्वारे त्यांनी देशाच्या विकासाची मनोकामना केली.’सूर्यवंशी’ श्रीरामाचे प्रतीक असलेला सूर्य,’शरयू’ नदी आणि मंदिराची अंतर्गत वास्तुरचनाही या टपाल टिकिटावर चित्रित करण्यात आली आहे. सूर्य देशात नव्या प्रकाशाचा संदेश देत आहे तर ,रामाच्या आशीर्वादाने देश सदैव चैतन्यदायी राहील हे शरयूचे चित्र सूचित करते. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासासह टपाल विभागाला स्मारक तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या संतांची देखील पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
प्रभू राम, माता सीतामाई आणि रामायण यांच्याशी संबंधित शिकवण काळ, समाज आणि जातीच्या सीमांच्या पलीकडे जाऊन इथल्या प्रत्येक व्यक्तीशी जोडलेली आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अत्यंत कठीण काळातही प्रेम, त्याग, एकता आणि धैर्याची शिकवण देणारे रामायण संपूर्ण मानवजातीला जोडते, त्यामुळे रामायण नेहमीच जगाच्या आकर्षणाचे केंद्र राहिले आहे, असे ते म्हणाले. प्रभू राम, माता सीतामाई आणि रामायण यांना जगभर किती अभिमानाने पाहिले जातं, याचे प्रतिबिंब म्हणजे आज प्रकाशित करण्यात आलेली पुस्तके आहेत, असे ते म्हणाले.
अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कंबोडिया, कॅनडा, चेक प्रजासत्ताक, फिजी, इंडोनेशिया, श्रीलंका, न्यूझीलंड, थायलंड, गयाना, सिंगापूर यांसारखे देश अशा अनेक राष्ट्रांपैकी आहेत ज्यांनी भगवान रामाच्या जीवनातील घटनांवर आधारित टपाल तिकिटे मोठ्या आवडीने जारी केली आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले. प्रभू श्री राम आणि माता जानकीच्या कथांबद्दल सर्वप्रकारची माहिती असलेला नुकताच प्रकाशित केलेला अल्बम आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल सूक्ष्म माहिती देईल, असे ते म्हणाले.प्रभू राम हे भारताबाहेरही तितकेच महान आदर्श कसे आहेत आणि आधुनिक काळातही त्यांची कीर्ती किती थोर आहे हे देखील यात मांडण्यात आले आहे.
महर्षि वाल्मिकींचे , यावत् स्थास्यंति गिरयः, सरितश्च महीतले। तावत् रामायणकथा, लोकेषु प्रचरिष्यति॥ हे स्तवन आजही अजरामर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. याचा अर्थ असा की, जोपर्यंत पृथ्वीवर पर्वत आणि नद्या आहेत तोपर्यंत रामायणाची कथा आणि प्रभू श्रीरामांचे व्यक्तिमत्व लोकांमध्ये अजरामर राहील, असे पंतप्रधानांनी सांगितले.