इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालनाः मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नसून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करीत आहै, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीला.यांनी केला. मुंबईच्या आंदोलनावर ठाम असून, गोळ्या घातल्या, तरी आंदोलन करणारच असा इशारा त्यांनी दिला.
जरांगे पाटील यांनी शनिवारी मुंबईकडे प्रस्थान ठोकण्यासाठी जय्यत तयारी केली असताना आंदोलन होणार नसल्याचे सांगताना मराठा आरक्षणावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे म्हणाले, की तोडगा निघाल्याच्या बातम्यांत कोणतेही तथ्य नाही. मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा निघाला नाही. सगेसोयरेच्या मुद्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे. मुंबईच्या आंदोलनात विघ्न आण्यासाठी ट्रॅप रचला आहे. मराठा समाजातीलच काही असंतुष्ट नेत्यांना हाताशी धरले आहे; पण आम्ही त्यांचा हा कट उधळवून लावू, असे जरांगे यांनी सांगितले.
कायद्याचे हात लांब असू दे, की आखूड. मराठा समाज कुणालाही घाबरत नाही, असा इशारा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. आमच्याविरोधात येणाऱ्यांना आम्ही सरळ करू. २५० बांधवांनी आत्महत्या केल्याची दखल घेऊन सरकारने भानावर यावे. या प्रकरणी सकारात्मक मार्ग काढावा. मुंबईला गेल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. प्रसंगी सरकारच्या गोळ्या झेलण्याची माझी तयारी आहे, असा इशारा देऊन जरांगे यांनी मराठा बांधवांना एकजूट सुटू देऊ नका. विचार मरू देऊ नका. आंदोलन थांबवू नका, अशी कळकळीची विनंती केली.
ट्रॅप रचणाऱ्या नेत्यांची नावे दोन दिवसांत जाहीर करण्याचा इशारा देऊन ते म्हणाले, की मुंबईला येण्याची आम्हाला हौस नाही. सरकारने वेड्यात काढू नये तसाच संभ्रम निर्माण करू नये. मराठा समाजाने दिशाभुलीला बळी पडू नये.