मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने अमृत २.० अभियानांतर्गत राज्यातील विविध शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि प्रक्रिया प्रकल्प राबविण्यात येत आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, सातारा, शेगाव व भद्रावती या शहरात हाती घ्यावयाच्या पाणीपुरवठा, तर सांगली शहरातील मलनिःसारण प्रकल्पांचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. १२०१ कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे या शहरांतील नागरिकांना शुद्ध पाण्याचा शाश्वत पुरवठा तसेच मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधीचे (पीएमस्वनिधी) प्रातिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात येईल.
अमृत २.० अभियान
देशातील शहरे पाणीपुरवठ्याबाबत जल सुरक्षित करण्याच्या व शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने सन २०१५ मध्ये अमृत अभियान सुरू केले आहे. २०२१ पासून अमृत २.० अभियान या नावाने हे अभियान अधिक व्यापक स्वरुपात राबविण्यात येत आहे. अमृत २.० अभियानातील प्रकल्पांची कामे सन २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
या अभियानात राज्यातील १४५ शहरांचे २८३१५ कोटी रुपये किंमतीचे ३१२ प्रकल्प केंद्र शासनाने मंजूर केले आहेत. या अभियानातून ४१.४७ लाख इमारतींना नळ जोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यात येणार असून ३८.६९ लाख इमारतींना मलनिःसारणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानातून शहरातील सरोवर पुनरुज्जीवन आणि उद्यान विकासाचे प्रकल्प देखील राबविले जाणार असून त्याचा या शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे.
भूमिपूजन करण्यात येणाऱ्या सात शहरांतील प्रकल्पांपैकी भिवंडी-निजामपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ४२६.०४ कोटी रूपये इतका असून या माध्यमातून ८४ हजार ५०० नवीन नळ जोडणीद्वारे एक लाख ७७ हजार ८७ घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता १४३ एमएलडी इतकी आहे. शेगाव येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च १६१.९७ कोटी रूपये असून या प्रकल्पाच्या माध्यमातून २६६२ हून अधिक नवीन जोडण्यांद्वारे १२ हजार ९२० घरांना लाभ मिळू शकणार आहे. या प्रकल्पात पाणी प्रक्रिया क्षमता ११ एमएलडीने वाढून ३४.८९ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात येईल.
उल्हासनगर येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून ४० हजार ७०९ नवीन नळ जोडण्यांद्वारे ४६ हजार ८४० घरांना लाभ दिला जाणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १२६.५८ कोटी रुपये अपेक्षित आहे. सातारा येथील पाणीपुरवठा प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता १५ एमएलडीने वाढणार असून ७३२८ नवीन जोडण्यांद्वारे ५० हजार ४५४ घरांना लाभ मिळणार आहे. या प्रकल्पासाठी १०२.५६ कोटी रूपये इतका खर्च येणार आहे. कल्याण-डोंबिवली येथील ७७.५८ कोटी रूपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या माध्यमातून एक हजार नवीन नळ जोडण्या दिल्या जाणार असून याचा लाभ १२ हजार १०० घरांना मिळणार आहे. तर, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पाणीपुरवठा प्रकल्पात ५९८० नवीन पाणी जोडण्यांद्वारे ७३१४ घरांना लाभ मिळेल. या प्रकल्पाची पाणी प्रक्रिया क्षमता ७.७९ एमएलडीने वाढणार असून या प्रकल्पाचा खर्च ५२.८७ कोटी रूपये इतका अपेक्षित आहे.
सांगली येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च २५३.४१ कोटी रूपये इतका असून ४१ हजार २७७ नवीन जोडण्यांद्वारे एक लाख चार हजार १७२ घरांना त्याचा लाभ होईल. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता ५९ एमएलडीने वाढविण्यावर भर देण्यात आला आहे.
पीएम स्व – निधी योजनेच्या लाभार्थ्यांना कर्जाचे वितरण
कोविड १९ च्या प्रादुर्भावानंतर पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळत्या भांडवलाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्यासाठी पीएम स्व-निधी योजना अंमलात आणली. राज्यात १७ जून २०२० पासून या केंद्र पुरस्कृत योजनेची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाने राज्याला दिलेले सहा लाख ६० हजारांचे उद्दिष्ट नोव्हेंबर अखेर पूर्ण झाल्याने केंद्राने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सुधारित उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार या योजनेच्या सोलापूर शहरातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे.