वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि अभिनेत्री दीपिका चिखलिया हे सध्या अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेला ते हजेरी लावणार आहेत. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये हे तीन ही दिग्गज कलाकार अयोध्येच्या रस्त्यावर फेर फटका मारताना दिसले आहेत. तर, त्यांच्या मागे असंख्य लोकांचा जमाव आहे, जो रामाचा जयघोष करत चालला आहे. या तिन्ही कलाकारांपासून लोकांना दूर ठेवताना सुरक्षा यंत्रणेची मात्र तारांबळ उडाली आहे.
या व्हिडीओमध्ये अरुण गोविल आणि सुनील लाहिरी यांनी पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला आहे. तर, अभिनेत्री दीपिका चिखलिया लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकदा या तीन कलाकारांना एकत्र पाहण्याची संधी चाहत्यांना मिळाली आहे. ९०च्या दशकातील ‘रामायण’ मालिकेचा काळ पुन्हा एकदा परत आल्यासारखं चाहत्यांना वाटत आहे. ‘रामायण’ ही मालिका सुपरहिट झाल्यानंतर यातील कलाकार देखील घराघरांत अगदी देवांप्रमाणे पूजले जात होते. या तिन्ही कलाकारांना एकत्र पाहून ‘राम, लक्ष्मण आणि सीता अयोध्येत परतले’, असे चाहते म्हणत आहेत.
बॉलिवूड, टीव्ही, क्रीडा आणि राजकारणातील काही खास लोकांनाही यावेळी अयोध्येत आमंत्रित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक दिवसाविषयी बोलताना रामाची भूमिका साकारणारा अभिनेता अरुण गोविल म्हणाले की, ‘राम मंदिर हे आपले राष्ट्रीय मंदिर ठरेल. हे मंदिर गेल्या काही वर्षांत जगभरात लुप्त होऊ लागलेल्या संस्कृतीचा पुन्हा जागर करेल, ज्या मुळे देशाची संस्कृती पुन्हा मजबूत होईल.