मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ज्यावेळी आपण निर्धार करतो, तो कसा करावा यासाठी इतिहासात डोकावून पाहिलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्याचा निर्धार मां जिजाऊंनी केला होता. त्याचप्रमाणे झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबेडकर, रखमाबाई राऊत यासारख्या महिलांनी निर्धार केला. त्यांच्या पावलावर पाउल टाकून महिलांनी वाटचाल करायला हवी. पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्व समाज बांधवाना सोबत घेऊन महिलां संघटन अधिक मजबूत करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचा झेंडा सर्वाधिक कसा फडकेल यासाठी महिलांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मुंबईत आज षण्मुखानंद सभागृहात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य नारीशक्ती निर्धार मेळावा पार पडला. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित महिला भगिनींना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मंत्री धर्मराज बाबा आत्राम, मंत्री अनिल पाटील,मंत्री अदिती तटकरे, मुंबई अध्यक्ष माजी खासदार समीर भुजबळ, आमदार नितीन पवार, मनोहर चंद्रिकापुरे, उमेश पाटील, महिला पदाधिकारी राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, आभा पांडे यांच्यासह पदाधिकारी व राज्यभरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपण कुठे आहोत हे आपल्याला बघायला मिळालं आहे. भाजपनंतर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अतिशय बळकट आणि राज्यातील नागरिकांचा विश्वास आहे. त्यामुळे पक्षातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी महिलांनी सर्व स्थरातील महिलांचे प्रश्न समजून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. गावपातळीवर शहरात वार्ड पातळीवर पक्ष अधिक बळकट करावा.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तुमच्या सोबत आहे असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
ते म्हणाले की, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लवकरच लोकसभेत देखील महिलांना आरक्षण मिळणार आहे. परंतु पहिली परिक्षा ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद ही आहे ही परिक्षा पास झाल्यावर आमदार आणि खासदार येथेही आपल्याला मोठी संधी उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले.