नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा तीन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एक भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ आणि आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिंडोरीरोड भागातील कैलास शांताराम नेवासकर (रा.हरिकुटी हौ.सोसा.सावरकर गार्डन मागे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नेवासकर कुटूंबिय दि.५ ते १४ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप व कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व रोकड असा सुमारे ६२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार भोज करीत आहेत.
दुसरी घटना माडसांगवी ता.जि.नाशिक येथे घडली. मधुकर टिंबू पेखळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पेखळे कुटूंबिय बुधवारी (दि.१७) दुपारी कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे रोकड व मोबाईल असा सुमारे २ लाख ६४ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.