नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य उत्पादन शुल्क विभागाने इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कु-हे येथे पोल्ट्री फार्म मध्ये राजरोसपणे सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना उदध्वस्त केला. तब्बल चार दिवस दबा धरून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघाना गजाआड करण्यात आले आहेत. या कारवाईत बेकायदा दारूसह साहित्य असा सुमारे १४ लाख २७ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई भरारी पथक क्र.१ ने केली.
या कारवाईत संजय भिमाजी गुळवे व बच्चू मंगा भगत या दोघा संशयितांना अटक करण्यत आली आहे. बेलगाव कु-हे येथील मल्हार पोल्ट्री फार्म येथे देशी दारूची निर्मीती होत असल्याची माहिती एक्साईज मिळाली होती. त्यानुसार अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सापळा लावण्यात आला होता. चार दिवस तळ ठोकून बसलेल्या पथकास मंगळवारी (दि.१६) रात्री खात्री पटताच हा छापा टाकण्यात आला. या ठिकाणी दोघे संशयित देशी दारूची निर्मिती करतांना मिळून आले. घटनास्थळावर ९० मिली क्षमतेच्या ८ हजार ५०० सिलबंध्द प्लॅस्टीक बाटल्या (एकुण ८५ बॉक्स) मिळून आले. तर ९० मिली क्षमतेच्या १ हजार २५० रिकाम्या बाटल्या मिळून आल्या. छुप्या पध्दतीने सुरू असलेल्या या कारखान्यात स्पिरीटचे ड्रम हे जमिनीत गाडलेले होते.
दोघा संशयितांना बेड्या ठोकत पथकाने द्रावण मिश्रण करण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक बेंडीग मशिन,शुध्द पाणी पुरवठा करणारे अॅरो,अॅरो प्लॅटच्या दोन इलेक्ट्रीक मोटारी,बुचे सिल करण्यासाठी लागणारे अॅटोमॅटीक बोटलीग मशिन,बाटल्या ठेवण्यासाठी लागणारे ४० प्लॅस्टीक ट्रे,रबरी नळी, दहा हजार बनावट लेबल,८०० रिकामे कागदी पुठ्ठे,कागदी बॉक्सचे पार्टीशियन करता लागणारे दोन हजार नग,सहा प्लॅस्टीक टेप,डिंकाच्या बाटल्या,दोन नरसाळे,२०० लिटरच्या ९ प्लॅस्टीक ड्रम असा सुमारे १४ लाख २७ हजार ६१० रूपये किमतीचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.
ही कारवाई अधिक्षक शशिकांत गर्जे व उपअधिक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक क्र.१चे निरीक्षक आर.सी.केरीपाळे, जवान सुनिल दिघोळे,कैलास कसबे,राहूल पवार,विजेंद्र चव्हाण आदींसह अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर व त्यांचा स्टॉफ तसेच ब विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख,क विभागाचे निरीक्षक गंगाराम साबळे आणि विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक अरूण चव्हाण व त्यांच्या स्टॉफने केली. अधिक तपास निरीक्षक केरीपाळे करीत आहेत.