येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणप्रश्नी राज्यव्यापी जनजागृती मोहिमेवर असलेल्या मनोज जरांगे – पाटील यांची येवल्यात दणदणीत सभा पार पडली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जरांगे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मनोज जरांगे – पाटील यांचे येवल्यात आगमन होताच २० जेसीबीच्या माध्यमातून जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
शहरातील विंचूर चौफुली ते कृषी उत्पन्न बाजार समिती पर्यंत जरांगेपाटील यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. व्यासपीठावर आगमन होताच सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. छ्त्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन जरांगे पाटील यांनी विशाल जनसमुदायाला मार्गदर्शन केले. आम्ही तुम्हाला आपले मानले पण तुम्ही आम्हाला आपले मानायला तयार नाही असा टोला भुजबळाना देत गेल्या ७० वर्षात भुजबळ यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना मराठा समाजाने मोठे केले आहे. त्यांची मान कधीही खाली जाऊ दिली नाही. याची जाणीव ठेऊन आमच्या आरक्षणाला होणारा विरोध करू नका असे सांगत राज्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा इशारही त्यांनी सरकारला दिला.
मराठा आणि कुणबी एकच
येत्या १४ तारखेला अंतरवेली सराटी येथे मराठा समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला असून मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले. मराठा आणि कुणबी एकच आहेत. आम्हाला आमचे आरक्षण द्या, तुमचे तुम्हाला ठेवा. इतर कोणाचाही वाटा आम्ही मागत नाही, गरीब मराठा समाजाला त्यांचे हक्काचे व टिकणारे आरक्षण द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी येवला येथे झालेल्या सभेत सांगितले. सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित या मेळाव्यास सुमारे ५० ते ६० हजार मराठा बांधव उपस्थित असल्याचा दावा आयोजकांनी केला.
आंदोलकांशी केली चर्चा, चार तास उशीरा सभा सुरु
येवला येथे त्यांचे आगमन होताच तहसील कार्यालय आवारात मराठा आरक्षण प्रश्नी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. येवला येथे सकाळी ९ वाजता सभेची वेळ होती. मात्र नाशिक ते येवला दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे स्वागत होत असल्याने येवल्यात सभा सुमारे चार तास उशिरा सुरू झाली. माजी आमदार कल्याणराव पाटील आमदार नरेंद्र दराडे जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, संजय बनकर, रतन बोरणारे, विठ्ठलराव शेलार यांच्यासह सर्व मान्यवर नागरिकांमध्ये बसले होते.
४० दिवसाचा कालावधी दिला
सुमारे चार तास उशीर होऊनही हजारोंच्या संख्येने नागरिक थांबून होते. यावेळी झालेल्या सभेत उपस्थितीनी मनोज जरंगे यांच्या लढ्यात पाठींबा देण्याचे विविध वक्त्यांनी जाहीर केले. जरांगे पाटील म्हणाले आमचे उपोषण वास्तव मागणीसाठी आहे. मराठा आणि कुंणबी एकच आहे. महाराष्ट्रातील सबंध मराठा समाज शेती करतो. त्याचा नोंदी सर्वत्र आहे. मराठवाड्यात उर्दू, फारशी, मोडी अशा विविध भाषेतील कागदपत्रात या पाच हजार नोंदी आम्ही संकलित केलेले आहेत. त्यामुळे उपोषणाबाबत चर्चेला आलेल्या शिष्टमंडळाला आम्ही चार दिवसाचा कालावधी देण्याबाबत ठाम होतो. यावेळी सातत्याने टिकणारे आरक्षण हवे तर एक महिन्याच्या कालावधी द्या असे राज्य शासन वारंवार सांगत होते. खरे तर मंत्रिमंडळ एक ठराव करून देखील आरक्षण देऊ शकत होते. मात्र, त्यांनी दिलेल्या आरक्षण टिकले नाही, तर ते पुन्हा महिन्याच्या कालावधी दिला नाही असे म्हटले असते. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी एक महिन्याच्या कालावधी देण्याचा ठराव करावा, तशी विनंती सर्वपक्षी नेत्यांनी केल्यावर आम्ही तीस, नव्हे तर ४० दिवसाचा कालावधी दिला आहे.
हा समाज स्वस्त बसणार नाही
मात्र, यापुढे हा कालावधी संपल्यावर हा समाज स्वस्त बसणार नाही, असा इशारा त्यांनी त्यांना दिला. जरांगे पाटील म्हणाले, यापुढे आरक्षणासाठी मराठा समाजाच्या कोणत्याही मुलाला आत्महत्या करावी लागणार नाही. आंदोलन आमचे, मागणि आमची, अभ्यास आमचा, आरक्षण देखील आमचे ते आम्ही मिळेल शिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.यावेळी सकल मराठा समाजासह आमदार नरेंद्र दराडे,माजी आमदार कल्याणराव पाटील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे युवा नेते संभाजीराजे पवार ,रतन बोरणारे ,विठ्ठलराव शेलार ,संजय बनकर, अमृता पवार ,छगन आहेर सचिन आहेर महेश काळे अरुण काळे यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते.