नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दसक येथील सिध्देश्वर नगर भागात सोसायटीच्या टेरेसवरून ग्लास फेकल्याच्या वादातून जाब विचारणा-या दांम्पत्यास शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह विवीध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार ऐश्वर्या आमले, कोमल पटेल, सुजित आमले व अन्य इसम (रा.सर्व गजानन स्नेह अपा.महादू बाबा मंदिराजवळ,सिध्देश्वरनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (दि.१५) रात्री ही घटना घडली.
हे सर्व जण सोसायटीच्या टेरेसवर साऊंड सिस्टीम लावून नाचत होते. यावेळी एकाने काचेचा ग्लास टेरेसवरून सोसायटीच्या आवारात फेकल्याने हा वाद झाला. पीडित महिलेसह तिचा पती जाब विचारण्यासाठी टेरेसवर गेले असता संतप्त संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी करीत दोघांना मारहाण केली. यावेळी पीडितेचा विनयभंग करण्यात आला अधिक तपास उपनिरीक्षक बटूळे करीत आहेत.