नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे होत असून नाशिक महानगरपालिकेचे मात्र या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत आहे. इंदिरानगर भागात सायकल ट्रॅकच्या शेजारी मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामे झाले असून यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर धंदे होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे केलेल्या होत्या. याबाबत नाशिक महानगरपालिकेला तक्रार दिल्यानंतर देखील कोणतीही कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे आमदार देवयानी फरांदे याच आज रस्त्यावर उतरल्या.
यावेळी नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर, विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नगररचना विभागाचे एन. एस. शिरसाठ यांच्यासह इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे, महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता सोनवणे आदी अधिकार्यांसह मोठ्याच प्रमाणावर परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.
यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी अशा प्रकाराने बेकायदेशीर अतिक्रमण होत असताना नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी काय करत असतात असा प्रश्न विचारला. तसेच अनेक बांधकामे हे अकृषक परवाना नसलेल्या जागेवर उभे असल्याचे समोर आले. या सगळ्यांना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे काय? असा सवालही आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित केला. यावर नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना नोटीसा दिल्या आहे असे उत्तर दिल्यावर बेकायदेशीर बांधकामांना किती वेळा नोटीसा देणार? असा प्रश्न उपस्थित करताना या बेकायदेशीर बांधकामांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आमदार देवयानी फरांदे यांनी दिले.
या सर्व बेकायदेशीर हॉटेलमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. असे असताना अन्न व औषध प्रशासन यांना मान्यता कशी देते असा सवाल उपस्थित करताना आमदार देवयानी फरांदे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त संजय नरगुडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाबाबत असमाधान व्यक्त करताना नागरिकांच्या जिवीताशी होत असणाऱ्या खेळाबाबत नाराजी व्यक्त केलीय याबाबत तत्काळ कारवाई करण्याची विनंती देखील सह आयुक्त यांना केली.
उपस्थित असणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांना शेतीच्या जमिनीवर व्यावसायिक मीटर कशा पद्धतीने दिले गेले असे विचारणा केली असता त्यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल असे आश्वासन देऊन सदर हॉटेलचे लाईटचे मीटर जप्त केले. नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करताना याबाबत कारवाई करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करून उपायुक्त नेर यांची खुर्ची जप्त करणे भाग पडेल असा इशारा आमदार देवयानी फरांदे यांनी दिला,
यावेळी नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे. सुनील खोडे, सचिन कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, वैभव कुलकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष सागर शेलार, अजिंक्य साने, सुनील देसाई, उदय जोशी, सुनील फरांदे यांच्या सह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.