नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगाघाटावर उधार घेतलेल्या कानातील बाळीचे पैसे मागितल्याने संतप्त तरूणाने एका व्यावसायीकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत संशयिताने काही तरी हत्याराने वार केल्याने व्यावसायीक जखमी झाला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम रामदास सोनवणे (रा.२० रा.अवधुतवाडी,पंचवटी) असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. याबाबत योगेश संजय निकम (रा.मुरलीधरकोट गंगाघाट) यांनी फिर्याद दिली आहे. निकम यांचे गंगाघाटावर दुकान आहे. या दुकानातून संशयिताने कानातील बाळी उधारीवर खरेदी केली होती. मात्र पैसे न दिल्याने ही घटना घडली.
शनिवारी (दि.१३) सायंकाळच्या सुमारास निकम समर्थ कलेक्शन समोरून पायी जात असतांना त्यांना सोनवणे दिसला. त्यांनी सोनवणेस गाठून उधारीच्या पैश्यांची मागणी केली असता संशयिताने शिवीगाळ व दमदाटी करीत त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत निकम जखमी झाले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक गावीत करीत आहेत.