नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मखमलाबाद येथील कोळीवाडा भागात नव्याने बांधकाम सुरू असलेल्या साईटवरील पत्रे चोरल्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. सोमवारी (दि.१५) रात्री ही घटना घडली असून, यात दोन्ही गटातील सहा जण जखमी झाले आहेत. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक विलास हांडोरे (२७ रा.गौरीपुत्र अपा.दत्तचौक आरटीओ जवळ,म्हसरूळ) या युवकाने फिर्याद दिली आहे. हांडोरे सोमवारी रात्री कोळीवाडा भागातील आपल्या बांधकाम साईटवर असतांना संशयित शुभम गोतरणे, रवी माळेकर, गणेश निंबारे,अ जय राथड, सचिन कडाळे, रविंद्र ब्राम्हणे, भगवान जाधव, हिरामण कडाळे, रवी माळेकर, मिलींद दहावाड व अन्य दहा ते बारा जणांचे टोळके तेथे आले. यावेळी हांडोरे यांनी आमच्या बांधकाम साईटवर चोरी का करता असा जाब विचारला असता संशयितांनी गैरकायद्याची मंडळी जमा करून शिवीगाळ करीत हांडोरे यांच्यासह रामदास शेजवळ, प्रफुल्ल शेजवळ, केतन शेजवळ व अजय डफडे यांना लाकडी दांडक्याने तसेच साईटवर पडलेल्या दगड विटा आणि अल्युमिनीअमच्या पातेल्याने मारहाण केली.
या घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. तर शुभम भाऊसाहेब गोतरणे (१९ रा.समाज मंदिरामागे,कोळीवाडा) या तरूणाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित रामदास शेजवळ,प्रफुल्ल शेजवळ व केतन शेजवळ आदींनी तुम्हा आमच्या बांधकाम साईटवरील पत्रे चोरले आहेत असे म्हणून काठीने व दगडाने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या घटनेत गोतरणे जखमी झाला असून याबाबत परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक माळी व जमादार भोज करीत आहेत.