नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने जुने नाशिक परिसरातील नानावली भागात बेकायदा पिस्तूल बाळगणा-या दोघांना गजाआड केले आहे. या संशयितांच्या ताब्यातून गावठी कट्यासह जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणाात आला आहे.
महम्मद अन्वर सय्यद (२८ रा.फेमस बेकरीमागे,नानावली) व निखील बाळू पगारे (२९ रा.दादाज अपा.विक्रीकर भवन समोर पाथर्डी फाटा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत युनिटचे अंमलदार विलास चारोस्कर यांनी फिर्याद दाखल केली आहे. नानावलीतील गुमाशाबाबा दर्गा भागात फिरणा-या दोघांकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकास मिळाली होती.
युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी (दि.१६) सायंकाळी धाव घेत दोघांच्या मुसक्या आवळल्या असता संशयिताच्या अंगझडतीत सुमारे ३० हजार रूपये किमतीचा देशी बनावटीचा स्टिलचा पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे असा ऐवज मिळून आला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बिडगर करीत आहेत.