नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अॅपचा अॅक्सेस घेत भामट्यांनी बँक खात्यातील तब्बल ११ लाख रूपयांची रक्कम वेगवेगळया खात्यात वर्ग केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटीअॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअर्सची रक्कम डिमेट अकाऊंटमध्ये जमा करण्याच्या बहाण्याने भामट्याने वृध्दाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दामोधर भास्कर भिडे (८३ रा.ऑस्कर प्राईड दातेनगर,सावरकरनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. भिडे यांच्याशी गेल्या २८ डिसेंबर रोजी भामट्यांनी संपर्क साधला होता. ८६०१२३११२२ व ८००१०१२५५३ या मोबाईल धारकांनी फोनवरून संपर्क करीत आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून ही फसवणूक केली. भिडे यांनी घेतलेले बँक ऑफ बडोदाचे शेअर्स डिमेट अकाऊंटमध्ये जमा करण्याचा बहाणा करीत भामट्यांनी त्यांना मोबाईल एक अॅप इन्स्टॉल करण्यास भाग पाडले.
या अॅपचा अॅक्सेस घेत भामट्यांनी भिडे यांच्या बँक खात्यातील तब्बल १० लाख ८४ हजार ५२२ रूपयांची रक्कम परस्पर अन्य खात्यावर वर्ग करून घेत आर्थिक फसवणुक केली. ही बाब निदर्शनास येताच भिडे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.