नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भद्रकाली पोलिसांनी वेगवेगळया भागातून दोन चोरट्यांच्या ताब्यातून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. संशयितांच्या अटकेने भद्रकालीसह उल्हासनगर आणि पिंपळगाव (ब.) पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले आहेत.
आकाश संजय बांडे (२५ रा.जुने नाशिक) व गणेश रमेश पाटील (रा.मिर्ची हॉटेलजवळ,आडगाव) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयातील संशयितांचा माग काढत असतांना हवालदार संदिप शेळके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आकाश बांडे यास ताब्यात घेतले असता त्याने भद्रकाली आणि उल्हासनगर येथे केलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून एमएच १५ एएच २१२५ व एमएच ०५ बीके ६६५२ या सुमारे ५० हजार रूपये किमतीच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार नरेंद्र जाधव करीत आहेत.
दुस-या चोरट्याबाबत पोलिस नाईक अविनाश जुंदरे यांना माहिती मिळाली होती. संशयित पाटील याच्या मुसक्या आवळल्या असता त्याने भद्रकाली आणि पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून एमएच १५ सीबी ४९४० व एमएच १५ जीझेड ८९०३ या चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार सतिष साळुंखे करीत आहेत. ही कारवाई सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील तसेच तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,हवालदार नरेंद्र जाधव,सतिष साळुंखे,संदिप शेळके पोलीस नाईक लक्ष्मण ढेपणे, अविनाश जुंद्रे, महेशकुमार बोरसे, शिपाई नितीन भामरे, दया सोनवणे, निलेश विखे, सागर निकुंभ, धनंजय हासे, योगेश माळी व नारायण गवळी आदींच्या पथकाने केली.