नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- व्यावसायीक महिलेस जखमी करून अंगावरील दागिणे पळविणारा लुटारू पोलीसांच्या हाती लागला आहे. गुंगारा देणा-या या लुटारूस कसारा (जि.ठाणे) येथे शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. एकट्या दुकट्या महिलेस गाठून जबरी चोरी करणा-या भामट्याच्या चौकशीत त्याने आठ महिन्यांपूर्वी जबरी चोरी करतांना एका वृध्द महिलेचा निघृण खून केल्याची कबुली दिली आहे. जुगार खेळण्याच्या सवयीतून संशयिताने लुटमारीचे अस्त्र हाती घेतल्याचे प्रथमदर्शनी अंदाज असून त्याने अजून असे काही गुन्हे केले आहेत काय याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
विशाल प्रकाश गांगुर्डे (३५ रा.जेलरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सामनगाव रोड भागात शकुंतला जगताप या व्यावसायीक वृध्देस जखमी करीत भामट्याने सोन्याचांदीचे दागिणे लांबविले होते. गेल्या सोमवारी (दि.१) जगताप या सर्वेश्वर क्लॉथ स्टोअर्स मध्ये आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षाच्या प्रारंभीच भरदिवसा ही घटना घडल्याने वरिष्ठांच्या आदेशान्वये पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. नाशिकरोड पोलीसांसह युनिट १ व २ ची पथके लुटारूच्या शोधार्थ सतर्क झाली होती. पोलीसांनी परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेची तपासणी केली असता आठ महिन्यांपूर्वी लोखंडे मळा भागातही याच पध्दतीने दरोडा टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केले असता संशयाताबाबत संशय बळावला. त्यामुळे पोलीस पथक संशयिताच्या मागावर होते. मात्र संशयित वेश बदलून आपला ठावठिकाणा बदलत होता. युनिटचे निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी जिह्यातील देवळा कळवण तालूक्यांसह गुजरात राज्यातील वापी,वाडा,विक्रमगड तसेच मुंबईतील विरार भाईंदर तसेच जोगेश्वरी भाग पायदळी तुडवला मात्र तो हाती लागत नव्हता.
सोमवारी (दि.१५) तो कसारा जि.ठाणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलीसांनी कसारा गाठून संशयितास हुडकून काढले. चौकशीत त्याने व्यावसायी वृध्देवरील हल्यासह जून २०२३ उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील लोखंडे मळा भागात राहणाºया सुरेखा सुरेश बेलेकर (६०) या वृध्देचा खून केल्याची कबुली दिली. लुटमार करतांना वृध्देने प्रतिकार केल्याने तिला यमसदनी धाडत दागिणे लांबविल्याचे त्याने सांगितले असून, लुटमारीचा मुद्देमालाची संशयिताने कशी विल्हेवाट लावली याबाबत शोध सुरू असल्याची माहिती उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहाय्यक आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशयिताची गुन्हेगारी पार्श्वभूमि नसली तरी त्याने आपल्या नातेवाईकाच्या घरीही चोरी केल्याचे समोर आले आहे. जुगार खेळण्याचा नाद असल्याने पैश्यांच्या चणचणीमुळे त्याने लुटमारीचे अस्त्र हाती घेतल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. संशयितास नाशिकरोड पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले असून ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर,उपनिरीक्षक चेतन श्रीवत,विष्णू उगले,जमादार रविंद्र बागुल अंमलदार प्रविण वाघमारे,नाजीम पठाण,विशाल काठे, महेश साळुंखे,विजय सुर्यवंशी,प्रदिप म्हसदे,शरद सोनवणे,विशाल देवरे,प्रशांत मरकड,अमोल कोष्टी आदींच्या पथकाने केली.