नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या लढ्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून लाखो समाज बांधव २४ जानेवारीस कार व मोटारसायकल रॅलीने पुणे जिल्ह्यातून पिंपरी चिंचवड येथून सहभागी होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
या आंदोलनासाठी नाशिक जिल्ह्यातून कशी तयारी करण्यात आली हे सुध्दा सांगण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून अंदाजे प्रत्येकी एक ट्रक याप्रमाणे तांदूळ डाळ तेल शेंगदाणे व मसाल्याचे पदार्थ याप्रमाणे साहित्य त्या त्या तालुक्यातील समाज बांधवांनी आपापल्या स्वयंस्फूर्तीने जमा केले आहे ते सर्व साहित्य मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनासाठी येणाऱ्या समाज बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी वापरण्यात येणारा असून ज्या तालुक्यातून ते साहित्य जमा झाले आहे. त्या तालुक्यातील समाज बांधवांनी त्यांची एक कमिटी निर्माण करून ते सर्व साहित्य ट्रकमध्ये भरून आंदोलन स्थळापर्यंत नेण्याची व त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करणाऱ्या समाज बांधवांच्या सगळीकडे समन्वयकांकडे ते सोपवण्याची जबाबदारी घेतलेली आहे .
नाशिक शहरातून नवीन नाशिक सातपूर नाशिक रोड पंचक्रोशी देवळाली कॅम्प वडनेर पाथर्डी इंदिरानगर या परिसरातून अनेक समाज बांधवांनी वरील प्रमाणे साहित्य जमा केलेले असून ते देखील एका ठिकाणी जमा करण्याचे काम सुरू आहे. ते सर्व साहित्य या समाज बांधवांनी वरील प्रमाणे आंदोलन स्थळी पोहोचवणार आहे.
नाशिक जिल्ह्यातून मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातून किमान २५ ते ३० हजार समाज आपापल्या वाहनातून बांधव जाणार असून आंदोलन स्थळी पोजेपर्यंत व आज आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्यानंतर म्हणजेच आरक्षण मिळाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी न करता आनंद साजरा करत आपापल्या घरी सुखरूपपणे समाज बांधवांनी पोहोचावे यासाठी नियोजन सुरू आहे .
या अगोदरच्या नियोजनाप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व समाज बांधव हे इगतपुरी तालुका वगळता नाशिक येथील न्यायालयासमोरील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ २४ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेस जमून विल्होळी गावापर्यंत पाई व त्यानंतर आपापल्या वाहनाने मुंबईकडे रवाना होणार होते .परंतु काल अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी सुचवल्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सर्व आंदोलन समर्थक समाज बांधव २४ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जमल्यानंतर मुंबईच्या दिशेने रवाना न होता पुण्याच्या दिशेने रवाना होतील. साधारणपणे दुपारी दोन वाजेच्या दरम्यान पिंपरी चिंचवड या ठिकाणी जरांगे पाटील यांचे स्वागत करून त्या आंदोलन मोर्चात सहभागी होतील व त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या इतर समाज बांधवांसह नाशिकच्या ही सर्व आंदोलन करते सामाजिक बांधव हे लोणावळा मार्गे मुंबईकडे रवाना होतील .
नाशिक जिल्ह्यातून मराठा समाज बांधवांनी प्रत्येक घरातून किमान तीन ते चार व्यक्तींनी या आंदोलनात जाण्याचा निर्णय घेतलेला असून,नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक गावातून व नाशिक महानगरातून सकाळी आठ वाजेस मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मोटरसायकलवर फक्त दोनच समाज बांधव याप्रमाणे प्रत्येक समाज बांधवांनी स्वसंरक्षणासाठी हेल्मेट घालून मोटरसायकल रॅली नाशिक शहर व प्रत्येक तालुक्यातून पिंपरी चिंचवड शहराकडे रवाना होईल. त्याठिकाणी हे सर्व मोटरसायकल रॅलीतील समाजबांधव पुढे आंदोलनात सहभागी होऊन मुंबईच्या दिशेने रवाना होतील .