इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : आमदार अपात्रतेबाबतच्या विधानसभेचे अध्यक्ष राधाकृष्ण नार्वेकर यांच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस धाडली असून ८ फेब्रुवारीपर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहे. आता या याचिकेवर ८ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्या पक्षादेशाचे उल्लंघन करूनही नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या १४ आमदारांना अपात्र ठरवले आहे. त्यांच्या या निर्णयाला शिंदे गटाकडून आव्हान देण्यात आले आहे. गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात दाखल केलेल्या १३ याचिकांवर आज सुनावणी झाली. त्यानंतर पुढील सुनावणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. शिंदे यांची शिवसेना खरी असूनही त्यांच्या प्रतोदांचा पक्षादेश कसा लागू होत नाही, असा सवाल करून पधादेश न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शिंदे गटाने या याचिकेत केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी यांना अपात्र करा, अशी मागणी गोगावले यांच्या याचिकेत करण्यात आली आहे. त्यातून आदित्य ठाकरे यांच्यासह अंधेरीच्या नवनिर्वाचित आमदारांना वगळण्यात आले आहे.
आरोप – प्रत्यारोप
काल उध्दव ठाकरे यांनी नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर महा पत्रकार परिषद घेत जोरदार हल्ला केला. तर दुसरीकडे नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेत निर्णय बरोबर असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे निकालाचा हा मुद्दा काल पत्रकार परिषदेने गाजवला असला तरी आता ही लढाई न्यायालयात सुध्दा लक्ष वेधणार आहे.